मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांमध्ये सर्किटची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अर्शदने नुकताच कोर्ट मॅरेज (नोंदणी पद्धतीने विवाह) केला आहे. पत्नी मारिया गोरेटीसोबत त्याने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत पुन्हा एकदा लग्न केलं आहे. अर्शदने लग्नाच्या 25 वर्षांनंतर पुन्हा अशा पद्धतीने लग्न का केलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे. गेल्या 25 वर्षांत अर्शद आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या लग्नाला रजिस्टर्डच केलं नव्हतं.
अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी यांचा येत्या 14 फेब्रुवारी रोजी लग्नाचा 25 वा वाढदिवस आहे. या दोघांचं लग्न 14 फेब्रुवारी 1999 रोजी झालं होतं. त्यामुळे येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला अर्शद आणि मारिया हे वेडिंग अॅनिव्हर्सरीची सिल्वर जुबली सेलिब्रेट करणार आहेत. लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतरही या दोघांनी आपल्या लग्नाची नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी रजिस्टर्ड मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच त्यांनी 23 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने पुन्हा एकदा लग्न केलंय.
याविषयी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्शद म्हणाला, “लग्नाची नोंदणी करण्याचा विचार कधीच आमच्या डोक्यात आला नव्हता आणि ते गरजेचं आहे असंही आम्हाला कधी वाटलं नव्हतं. मात्र प्रॉपर्टीच्या विषयात आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर लग्नाची नोंदणी असणं गरजेचं असतं हे आम्हाला समजलं. म्हणूनच कायद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. अन्यथा एक जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांना कमिटेड आहोत, एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं.”
कोर्ट मॅरेजबद्दल बोलताना मारियाने सांगितलं की, “गेल्या काही काळापासून ती नोंदणी करण्याचा विचार करत होती. अखेर 25 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते शक्य झालं. मी एकाच व्यक्तीशी तिसऱ्यांदा लग्न करतेय.” यावेळी अर्शदने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच लग्न करण्यामागचा किस्सा सांगितला. “मारियाच्या आईवडिलांनी आम्हाला लवकरात लवकर लग्न करायला सांगितलं होतं. आम्ही लेंटदरम्यान (मारियाचं एक प्रकारचं व्रत) लग्न करू शकलो नाही. त्यानंतर कामात व्यग्र झालो. अखेर वर्ष बर्बाद न करता त्यावेळी जी तारीख योग्य वाटली होती ती म्हणजे 14 फेब्रुवारी. म्हणून त्याच दिवशी आम्ही लग्न केलं. आता माझ्याकडे व्हॅलेंटाइन डेची सर्वांत भयानक आठवण आहे, ती म्हणजे त्याचदिवशी मी लग्न केलं”, अशी मस्करी अर्शदने यावेळी केली.