“आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं”, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त

| Updated on: Dec 24, 2024 | 8:18 PM

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचे मुंबईत अंत्यसंस्कार झाले. यावेळी बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल भावना सांगत हळहळही व्यक्त केली.

आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त
Follow us on

चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक तथा निर्माते श्याम बेनेगल यांच्यावर मुंबईत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार बेनेगल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अंत्यसंस्कारापूर्वी बेनेगल यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सुमारे तासभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

श्याम बेनेगल यांच्या जाण्याने बॉलिवूड हळहळलं

श्याम बेनेगल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, सचिन खेडेकर, गीतकार गुलजार, इला अरुण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, प्रल्हाद कक्कड, बोमन इराणी, हंसल मेहता, रत्ना पाठक शाह, दिव्या दत्ता, रणजित कपूर, विवान शहा ,कुणाल कपूर, नंदिता दास, श्रेयस तळपदे, कुलभूषण खरबंदा यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

दरम्यान अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल भावनाही व्यक्त केल्या. ज्यामध्ये बोमन इराणी, नंदिता दास, श्रेयस तळपदे, जावेद अख्तर यांनी बेनेगल यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

1.
0:26

श्रेयस तळपदेने केल्या भावना व्यक्त

“श्याम बेनेगल यांच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव अत्यंत महत्वपूर्ण आणि संस्मरणीय आहे. त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी आणि त्यांच्यासोबत चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या व्यक्तीमत्वात फार फरक पडला. बेनेगल यांच्यासोबत काम करणं हा मोठा अनुभव होता. ते जणू चित्रपटसृष्टीचे विश्वकोष होते. त्यांनी नेहमीच कलाकारांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांना सन्मानाने वागवलं” अशा भावना अभिनेता श्रेयस तळपदेने व्यक्त केल्या आहेत.

 

तर,जावेद अख्तरही भावूक

“श्याम बेनेगल हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज होते. त्यांच्यापासून सर्वांनी शिकण्याची गरज आहे. 1974 ला म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी बेनेगल यांनी अंकुर चित्रपट बनवला होता. तेव्हापासून समांतर चित्रपटाला त्यांनी नवीन वेगळी ओळख मिळवून दिली. वास्तववादी चित्रपटाला महत्त्वाचं स्थान त्यांनी चित्रपट सृष्टीत मिळवून दिलं. त्यांच्या चित्रपटासाठी गीत लिहिण्याची मला संधी मिळाली, त्यामुळं मी स्वत:ला भाग्यवान समजतो” अशा भावना जावेद अख्तर यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मुंबई पोलिसांनी श्याम बेनेगल यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटून अंत्यसंस्कारासाठी सन्मानाने नेले. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाद्वारे यावेळी शोकधून वाजवण्यात आली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून बेनेगल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मत सर्वांनीच व्यक्त केलं आहे.