मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आरोपी असलेली मॉडेल मुनमुन धमेचा हिने एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिला एनसीबीने अटक केली होती. मात्र केवळ पब्लिसिटीसाठी त्यांनी अटक केल्याचा आरोप आता मुनमुनने केला आहे. मुनमुन धमेचाने आरोप केला आहे की, ज्या ठिकाणी ड्रग्ज मिळाले होते, तिथे फक्त दोघंच जण उपस्थित होते. मात्र त्या दोघांना सोडलं गेलं. मॉडेलिंग इंडस्ट्रीशी कनेक्शन असल्याने मीडियाचं लक्ष वेधलं जाईल, या हेतूने वानखेडेंनी अटक केली, असा दावा तिने केला आहे.
ड्रग्जप्रकरणी इतक्या महिन्यांनंतर मुनमुन धमेचाने मौन सोडलं आहे. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी घाबरून गप्प होते. मात्र जेव्हा सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केला, तेव्हा मला वाटलं की आता सत्य समोर येईल. वानखेडेंनी केवळ प्रसिद्धीसाठी मला अटक केली होती.”
ऑक्टोबर 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणी मुनमुन धमेचाला आर्यन खान आणि इतरांसह अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मुनमुन आणि आर्यन खानला 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुनमुन आणि आर्यनचा जामिन मंजूर केला होता. मात्र एनसीबीद्वारे जेव्हा मे 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केलं गेलं. तेव्हा त्यात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावं पुराव्यांअभावी समाविष्ट केली नव्हती. मात्र मुनमुनला एनसीबीने आरोपपत्रात दोषी ठरवलं होतं.
मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती 40 वर्षांची आहे. मुनमुनला NCB ने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली होती. मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती कुटुंबातून आहे. मुनमुन एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. मुनमुनच्या आईचं 2020 मध्ये निधन झालं होतं. तिचा भाऊ प्रिंन्स धमेचा दिल्लीमध्ये राहतो.
मुनमुन धमेचाने तिचं शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील सागर इथं पूर्ण केलंय. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती. इंस्टाग्रामवर तिचे दहा हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येते. या संबंधीचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिने आतापर्यंत वरुण धवन, अर्जुन रामपाल, व्हिजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.