मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : बिग बॉसच्या सतराव्या सिझनची अत्यंत धमाकेदार सुरुवात झाली. दर सिझनप्रमाणे यंदाही त्यातील स्पर्धक विविध कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सलमान खानने या शोमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक निवडून आणले आहेत. हे स्पर्धक वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनची वकील असलेल्या सना रईस खानचाही समावेश आहे. ड्रग्ज प्रकरणात सना ही आर्यन खानची वकील होती. मात्र तिला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणं चांगलंच महागात पडलं आहे. सनावर ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वकील आशुतोष यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सना रईस खानच्या ‘बिग बॉस’मधील सहभागावरून आक्षेप नोंदवला आहे. ‘मी बार काऊन्सिल ऑफ इंडियाला याबद्दलची माहिती दिली आहे की सना रईस खानने नियमांच्या विरोधात जाऊन बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे’, असं त्यांनी लिहिलं आहे. यासोबतच त्यांनी असंही लिहिलं आहे की ‘बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या नियम 47 ते 52 अंतर्गत, कोणताही वकील दुसऱ्या पद्धतीने कमाई करू शकत नाही. इतकंच नाही तर 1961 च्या सेक्शन 49 (1) (c) अंतर्गत, जो वकील प्रॅक्टीस करत असेल, त्याला इतर दुसऱ्या क्षेत्रात पूर्ण वेळ नोकरी करण्यात प्रतिबंध आहे.’
सना ही मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी क्रिमिनल ॲड्वोकेट आहे. तिने अनेक हाय-प्रोफाइल केसेसमध्ये आरोपींचं प्रतिनिधित्व केलं आहे. सनाने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आरोपी अवीन साहूचं प्रतिनिधित्व केलं होतं. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. याशिवाय शिना बोरा हत्येप्रकरणात सनाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं प्रतिनिधित्व केलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार तिने हिंदू गोवंश रक्षा समिती आणि सनातन संस्थेचे सदस्य वैभव राऊत यांचंही प्रतिनिधित्व केलं होतं. 2018 च्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात ते आरोपी होते.