मुंबई : अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वी वयाच्या 57 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. अभिनेत्री राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. 22 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यामागचं कारण सांगितलं. त्याचसोबत घटस्फोटाचं पाऊल उचलण्याआधी दोघांनी विशेष मदत घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 2022 मध्ये राजोशी यांना घटस्फोट दिल्यानंतर आशिष यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आम्ही खूप संवाद साधायचो. त्यामुळे आम्हाला समजलं होतं की आमच्यातील काही फरक किंवा काही गोष्टींचं व्यवस्थापन आम्ही करू शकत नाही. आम्हाला समजलं होतं की आणखी काही वेळ थांबलो तर भांडणं होतील, आम्ही एकमेकांवर नाराज होऊ आणि रागावू. आम्ही बऱ्याच वेळा एकमेकांशी संवाद साधला. त्याआधी आम्ही प्रोफेशनल्सकडून (समोपचार) मदतसुद्धा घेतली. आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण आम्हाला कळलं होतं की आता काहीच कामी येणार नाही. आम्ही दोघांनी याबद्दल चर्चा केली आणि अर्थलाही (मुलगा) विश्वासत घेतलं. आता जरी गोष्टी मला वेगळ्या वाटत असल्या तरी हे लग्न टिकावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे मनात त्या वेदना होत्याच.”
आशिष यांनी राजोशी यांना दुसऱ्या लग्नाबद्दलची कल्पना आधीच दिली होती. “मला एकटं राहायचं नाही याबद्दल मी फार स्पष्ट होतो. मला एखाद्याची साथ हवी आणि जर एखाद्या व्यक्तीला तो आनंद मिळत असेल, ठराविक व्यक्तीसोबत राहून त्याला सुरक्षिततेची भावना जाणवत असेल तर दुसऱ्यांनी त्यात मधे का यावं? त्यामुळे मी पिलूला दुसऱ्या लग्नाविषयी कल्पना दिली होती. तेव्हा ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतेय.” मी सुद्धा अर्थातच असं उत्तर दिलं. आयुष्यातील पहिला भाग संपल्यानंतर आम्ही दोघं आमच्या दुसऱ्या मार्गावर वेगवेगळ्या दिशेने चालत आहोत”, असं ते पुढे म्हणाले.
आशिष यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीयांवर काय परिणाम झाला याबद्दलही ते एका मुलाखतीत व्यक्त झाले होते. “पिलू ही फक्त माझ्या मुलाची आई आहे, असं मी तिला कधीच समजलो नाही. पिलू ही माझी मैत्रीण आहे, ती माझी पत्नी होती. हे सर्व कोणत्याही दु:खाशिवाय झालं असं कृपया समजू नका. एका व्यक्तीपासून विभक्त होणं हे नेहमी दु:खदायकच असतं. ती संपूर्ण प्रक्रिया खूप कठीण असते”, असं ते म्हणाले होते.