मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : अभिनयसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं. अशोक सराफ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर पुण्यात एका कार्यकर्माचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांनी पुणेकरांचं आपल्यावर असलेल्या प्रेमाबद्दल तर भावना व्यक्त केल्याच, पण मित्र आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत असलेल्या आठवणी देखील ताज्या केल्या…
महाराष्ट्राला सर्वात मोठ्या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं, कधी जुने सहकाही लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण येते… असा प्रश्न विचारल्यानंतर अशोक सराफ हसत म्हणाले, ‘पुरस्कार घेताना…? त्याची आठवण नेहमीच येते. कारण तो नट असला तरी आमचा मित्र म्हणून अधिक चांगला होता. मित्र म्हणून आम्ही त्याला कधीच विसरु शकणार नाही…’
‘सिनेमात अनेक जण येतात जातात, काम झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरी जातो. ही आठवण नसते. आम्ही एकाच ठिकाणी राहायला असल्यामुळे आम्ही मित्र होतो एकमेकांचे. मी सचिन, सुधीर जोशी, विजय पाटकर आम्ही एकमेकांचे मित्र असल्यामुळे ठरवून सतत एकमेकांना भेटत राहायचो.’
‘मित्र म्हणून माझं लक्ष्यावर प्रेम आहे. कलाकार म्हणून तो उत्तम होताच. त्याने ते साध्य देखील केलं… पण मित्र म्हणून तो फारच छान होता. कुठेतरी त्याची आठवण येतच राहते…’ असं देखील अशोक सराफ म्हणाले. खास मित्राच्या आठवणींमध्ये रमताना मामा भावूक देखील झाले.
सांगायचं झालं तर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमांच्या माध्यमातून मैत्रीचा खरा अर्थ चाहत्यांना समजावून सांगितला. आताच्या धावपळीच्या विश्वात खास मित्राचं असणं एक वेगळी आणि आनंदाची भावना असते. चांगल्या – वाईट काळात धावून येतो तो म्हणजे खरा मित्र..
‘बनवाबनवी’, ‘धूम धडाका’, ‘अफलातून’, ‘माझा छकूला…’, ‘आयत्या घरात घरोबा’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीबेर्डे यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. पण आज देखील चाहते दोघांचे सिनेमे तितक्याच आवडीने आणि प्रेमाने पाहातात.