मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : भारताचा वेगवान बॉलर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या बॅट्समनना मैदानावर टिकू दिलं नाही. भारताला विजय मिळवून देण्यात सिराजने निर्णायक भूमिका पार पाडली. या कामगिरीसाठी सिराजची ‘मॅन ऑफ मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. भारताने आठव्यांदा आशिया चषक पटकावलंय. श्रीलंकेचा संघ अवघ्या 15.2 षटकांत 50 धावातच गारद झाला. त्यानंतर भारताने 51 धावा करत विजय साकारला. या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण मोहम्मद सिराजचं कौतुक करू लागले. RRR चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनीसुद्धा सिराजसाठी विशेष पोस्ट लिहिली.
‘सिराज मियाँ, आमचा टॉली चौकीचा मुलगा आशिया चषकाच्या फायनल्समध्ये 6 विकेट्स घेत चमकला. त्याचं मन खूप मोठं आहे. स्वत:च्याच बॉलिंगवर तो बाऊंड्रीपर्यंत धावून गेला’, अशा शब्दांत राजामौलींनी कौतुक केलं. महेश बाबू आणि अनुष्का शर्मा यांनीसुद्धा विशेष पोस्ट लिहिली. अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टा स्टोरी आणि ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आणि सिराजची प्रशंसा केली.
Kya bowling kiye ho @mdsirajofficial 👏
What a spell and what a win by #TeamIndia. What a way to say we are ready for the world cup. 🏆🇮🇳#AsianCup2023 @BCCI pic.twitter.com/vDw7XedkSR
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 17, 2023
2018 च्या आशिया चषकाच्या विजयानंतर भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. सिराजने श्रीलंकन बॅट्समनना खेळपट्टीवर स्थिरावूच दिलं नाही. आपल्या आक्रमक बॉलिंगच्या जोरावर एकाच षटकात चार विकेट्स घेणारा सिराज हा वन डे इतिहासातील चौथा बॉलर ठरला आहे. जसप्रीत बुमराने पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कुसल परेराला शून्यावर बाद केलं. वेगवान बॉर्सना पूरक अशा खेळपट्टीवर सिराजला केवळ योग्य टप्प्यावर बॉलिंग करण्याची आवश्यकता होती. सिराजने श्रीलंकन डावाच्या चौथ्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतले. पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्वा यांना सिराजने माघारी धाडलं. यानंतर हार्दिक पंड्याने दुनिथ वेल्लालागे, प्रमोद मदुशन आणि मथीश पथिराना यांची विकेट घेत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. श्रीलंकेकडून सर्वाधिक 17 धावा कुसाल मेंडिसने केल्या.