मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते आणि प्रॉडक्शन टीमवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफरने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याविरोधात आता प्रॉडक्शन टीम आणि निर्माते असित कुमार मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सर्वांनी जेनिफरने केलेले आरोप फेटाळले आहेत.
“ती सेटवरील शिस्त पाळत नव्हती आणि तिचं कामावरही लक्ष नसायचं. तिच्या वागणुकीबद्दल आम्हाला सतत प्रॉडक्शन हेडकडे तक्रार करावी लागायची. तिच्या शेवटच्या दिवशीसुद्धा ती संपूर्ण युनिटसमोर उद्धटपणे वागली आणि शूट न संपवताच निघून गेली”, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शन टीममधील हर्षद जोशी, ऋषी दवे आणि अरमान यांनी दिली.
“मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिची वागणूक योग्य नव्हती. शूटनंतर निघताना तिने कोणाचीच पर्वा न करता वेगाने कार चालवली. तिने सेटवरील मालमत्तेचंही नुकसान केलं. तिच्या वाईट वागणुकीमुळे आणि बेशिस्तपणामुळे आम्हाला तिचा करार संपवावा लागला. या घटनेवेळी असितजी अमेरिकेत होते. आता ती आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय आणि तथ्यहीन आरोप करतेय. आम्ही आधीच याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, असं प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि जतिन बजाज म्हणाले.
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.
जेनिफरने सांगितलं की असित मोदींनी केलेल्या काही कमेंट्समुळे तिला अनकम्फर्टेबल वाटलं होतं. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र 2019 मध्ये जेव्हा ‘तारक मेहता..’ची टीम शूटिंगसाठी सिंगापूरला गेली होती, तेव्हा असित मोदींनी तिच्या ओठांबाबत कमेंट केली होती. “जेनिफर तुझे ओठ मला खूप आवडतात, असं वाटतं किस करावं”, हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याच ट्रिपमध्ये असित मोदींनी असंही तिला म्हटलं की, “मुनमुन तर रात्री बाहेर जाईल, तू एकटी काय करशील? ये आपण सोबत व्हिस्की पिऊयात.” हे ऐकल्यानंतर जेनिफर खूप घाबरली होती.