5 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनमधील रॅपर (rapper) क्रिस काबावर (Chris Kaba) पोलिसांनी गोळ्या झाडल्या. 24 वर्षीय क्रिस काबा हा कृष्णवर्णीय होता. तो ब्रिटिश हिप-हॉप ग्रुप ‘ड्रिल ग्रुप 67’चा (drill group 67) सदस्य होता. काही दिवसांतच बाबा होणाऱ्या क्रिसचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच संपूर्ण जगात खळबळ उडाली. हा सर्व प्रकार निष्काळजीपणाने झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
काबाच्या समर्थनार्थ यूकेमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांच्या कारवाईचा ते निषेध करत आहेत. क्रिसला न्याय मिळावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मनोरंजनविश्वात करिअर करू पाहणाऱ्या तरुण कलाकारांसाठी ते प्रोफेशनल कोच म्हणूनही काम करत होता.
क्रिस काबा हा यूकेमधील रॅप आणि सिंगिंग इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीने संगीत विश्वावर शोककळा पसरली. क्रिस काबाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत. पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या का झाडल्या, असाही सवाल नेटकरी करत आहेत.
5 सप्टेंबर रोजी सशस्त्र पोलीस अधिकारी गोळीबार करणाऱ्या एका संशयिताचा शोध घेत होते. याच दरम्यान कॅमेऱ्याने असे संकेत दिले की क्रिस काबा जी ऑडी कार चालवत होता ती गोळीबाराच्या घटनेशी संबंधित आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, सशस्त्र अधिकाऱ्यांनी त्या कारचा पाठलाग केला आणि त्यावर एक राऊंड फायरिंग केली. कारला मुद्दाम क्रॅश करण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यावेळी काबा ही गाडी चालवत होता आणि गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
IOPC ने दिलेल्या वृत्तानुसार घटनेच्या वेळी क्रिस काबाकडे कोणतीही शस्त्रं नव्हती. अलीकडेच काबाला MOBO पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. नुकताच त्याने करीमा व्हाईटशी साखरपुडा केला होता आणि तो लवकरच पिता बनणार होता. क्रिस काबा जी ऑडी चालवत होता ती देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत या घटनेबाबत आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.