आसामी (Assamese) अभिनेता किशोर दासचं (Kishor Das) शनिवारी 2 जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून तो कॅन्सरशी (Cancer) झुंज देत होता. अवघ्या तिसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. किशोरच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. किशोरवर चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्याने अखेरचा श्वास घेतला. मार्च 2022 मध्ये किशोरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आसामी मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशोरला कोविड-19 चीही लागण झाली होती. त्यामुळे त्याला आणखी अडचणींचा सामना करावा लागला. आनंदी व्यक्तिमत्त्व म्हणून किशोरची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच त्याने हॉस्पिटलच्या बेडवरून हसतानाचा फोटो शेअर केला होता. उपचाराविषयी चाहत्यांना अपडेट देताना किमोथेरपीच्या चौथ्या टप्प्यात असल्याचं त्याने सांगितलं होतं. किमोथेरपीचे दुष्परिणाम सांगताना किशोरने लिहिलं की, त्याला अशक्तपणा, उलट्या, चक्कर येणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
किशोरला कर्करोगाच्या चौथ्या स्टेजचं निदान झालं होतं. यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्याचं बदलून गेलं होतं. विशेषत: किमोदरम्यान त्याला अधिक त्रास होऊ लागला. किशोर हा आसाम इंडस्ट्रीतील उत्कृष्ट कलाकारांपैकी एक होता. त्याने आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं. त्याचं ‘टुरुट टुरुट’ हे गाणंही तेव्हा खूप गाजलं होतं. सोशल मीडियावरही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याचं निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे.
किशोर दासने ‘बंधून’ आणि ‘बिधाता’ या टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकांना खूप प्रेम मिळालं. याशिवाय तो अनेक लघुपटांचाही भाग होता. इतकंच नाही तर किशोर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’मध्येही दिसला होता. किशोर हा ‘मॉडेल हंट’मध्येही फर्स्ट रनरअप ठरला होता. त्याला मिस्टर फोटोजेनिक ही पदवीही मिळाली होती. 2020-21 मध्ये किशोर दासने एशियानेट आयकॉन अवॉर्ड फॉप मोस्ट पॉप्युलर अॅक्टर पटकावला होता.