‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अनेकदा लोकांच्या दिसण्यावरून मस्करी केली जाते. ही मस्करी काहींना अजिबात आवडत नाही. कॉमेडियन कपिल शर्मावर याबद्दल अनेकांनी खुलेपणाने राग व्यक्त केला. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये कपिलने ‘जवान’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अटली कुमार आणि पाहुण्या अर्चना पुरण सिंह यांच्या दिसण्याची खिल्ली उडवली. काहींना ही गोष्ट रुचली नाही. या शोमध्ये आगामी ‘बेबी जॉन’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. अभिनेता वरुण धवन, किर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि दिग्दर्शक अटली शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. यंदाच्या सिझनचा हा ग्रँड फिनाले एपिसोड होता.
या एपिसोडमध्ये कपिलने अटलीची दिसण्यावरून खिल्ली उडवली. तेव्हा अटलीने शांत न बसला त्याला सडेतोड उत्तर दिलं. “दिसणं फार महत्त्वाचं नसतं”, असं तो थेट कपिलला म्हणाला. अटलीने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याचे बरेच चित्रपट गाजले होते. ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती.
कपिलने अटलीला विचारलं, “पण जेव्हा तू सेलिब्रिटींना पहिल्यांदा भेटतोस, तेव्हा ते असं विचारतात का, अटली कुठे आहे?” त्यावर अटली उत्तर देतो, “मला तुझा प्रश्न समजला. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी ए. आर. मुरुगादोस सरांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी माझी स्क्रिप्ट वाचली, पण मी कसा दिसतो याकडे पाहिलं नाही किंवा मी त्या पात्रतेचा आहे की नाही याकडेही लक्ष दिलं नाही. पण त्यांना माझी कथा आवडली. मला असं वाटतं की जगाने ही गोष्ट पहायला हवी. आपण एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या प्रतिभेचं मूल्यमापन नाही केलं पाहिजे. दिसण्यावरून मतं नाही बनवली तर उत्तम. तुम्ही लोकांच्या मनावरून त्यांच्याबद्दल मत बनवा.” अटलीच्या या उत्तराची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
कपिलच्या वर्णभेदी टिप्पणीवरून नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत. याच एपिसोडमध्ये कपिलने नेहमीप्रमाणे अर्चना पुरण सिंह यांचीही खिल्ली उडवली. यावेळीही अटलीने अर्चना यांची बाजू घेत त्यांची मस्करी न करण्याची विनंती केली. अर्चना यांची ओळख करून देताना कपिल अटलीला सांगतो, “त्यांचं नाव अर्चना पुरण सिंह आहे कारण त्या डाकू मोहन सिंह यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत. त्यांच्या गँगमधील एका व्यक्तीवरून त्यांचं नाव अर्चना पुरण सिंह असं ठेवलंय.” हे ऐकल्यानंतर सर्वजण हसू लागतात. मात्र त्याचवेळी अटली कपिलला म्हणतो, “त्यांची मस्करी करू नका. या शोमध्ये मला आधार देणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. जेव्हा त्या हसतात, तेव्हाच मी हसणार. कारण मला काहीच माहीत नाही, मी क्यूसाठी थांबलोय.” त्यावर अर्चना म्हणतात, “बरोबर म्हणालास अटली, तू आणि मी आता एका टीममध्ये आहोत.”