अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं दीर्घ आजाराने सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगावर यशस्वी मात करून ते रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतुल परचुरे यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘लाडक्या मित्रा असं व्हायला नको होतं, खूप लढलास. खूप सहन केलंस. तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबास दु:ख सहन करण्याची शक्ती,’ अशी पोस्ट अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी लिहिली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शोक व्यक्त केला आहे. ‘अतुल, का रे का का रे. इतक्या लवकर का रे मित्रा?’, असं त्यांनी लिहिलंय.
पटकथालेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘मला माहितीये काळ पुढे सरकतो, आठवणी पुसट होतात, पण लख्खं लक्षात राहतो काही माणसांनी खांद्यावर टाकलेला हात, निर्धास्त मनाने वाटून खाल्लेलं पोटभर हसू, बोलताना केलेल्या लोभस खाणाखुणा आणि जग कोळून प्यायलेली त्यांची सूचक, मिश्किल नजर. रोजची भेट नसतानाही आपलीशी वाटणारी माणसं फार कमी असतात, ती अजून कमी झाली की गलबलायला होतं. तसं झालं आज. ज्याचं हसू पाहून हसण्यावर प्रेम जडलं, त्याच्याबद्दल लिहिताना डोळ्यातले अश्रू आवरावे लागतील, असं कधीच वाटलं नव्हतं. अतुल दादा, तुझ्या आठवणींना प्रत्येक रसिकाच्या मनात उदंड आयुष्य असणार आहे. खूप खूप प्रेम. खूप खूप आदर,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
अतुल परचुरे यांनी बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका करत व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.