पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या वैवाहित आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. हे दोघं कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याचंही म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचीही चर्चा होती. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरचं शोएबशी नाव जोडलं गेलं होतं. त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.
आयेशाने नुकतीच शोएब मलिकच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी शोएबसोबतच्या तिच्या कथित अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, "मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मी न सांगता सर्वांना माहीत आहे."
आयेशा आणि शोएबने एक फोटोशूट केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर बोलताना ती म्हणाली की "अफवा आधी सीमापार मीडियाने पसरवल्या. त्यानंतर आपल्या देशात त्याची अफवा पसरली."
घटस्फोटाबाबत सानिया किंवा शोएबकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र आयेशा ओमरमुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांनंतर लगेचच सानिया आणि शोएबने त्यांच्या 'मिर्झा मलिक शो'ची घोषणा केली. त्यावरून दोघांवर टीकासुद्धा झाली होती.
शोएबसोबतच्या अफेअरबाबत आयेशा याआधीही व्यक्त झाली होती. आयेशाने सांगितलं की शोएबसोबत तिने एक वर्षापूर्वी ते फोटोशूट केलं होतं. मात्र कॉन्ट्रोव्हर्सी पाहून माध्यमांनी त्या फोटोंचा वापर चुकीच्या पद्धतीने केला.
“शोएबसोबत मी एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. जर एखाद्याचं अफेअर असेल तर तो अशा पद्धतीचं फोटोशूट करून त्याला सोशल मीडियावर का पोस्ट करेल? मी कधीही कोणत्याही विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही”, असं तिने स्पष्ट केलं होतं.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केलं होतं. सानियाने 2018 मध्ये मुलाला जन्म दिला.