मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री आयेशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. आयेशाच्या कमबॅकची प्रतीक्षा चाहत्यांनी खूप केली, मात्र तिच्याकडून कोणत्याच प्रोजेक्टची घोषणा झाली नाही. आता नुकतंच आयेशाला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर आयेशाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी आयेशाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं. यानंतर आता ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का, या प्रश्नाचंही तिने उत्तर दिलं आहे.
एअरपोर्टवरील आयेशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली होती. त्याचसोबत तिचा लूक प्रचंड बदलल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. प्लास्टिक सर्जरीमुळे आयेशा आता ओळखूच येत नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. या सर्व ट्रोलिंगनंतर तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सर्वांत आधी एअरपोर्टवर जाण्याचं कारण सांगितलं. ‘हे सांगणं भाग आहे. दोन दिवसांपूर्वी मी गोव्याला गेली होती. माझ्या कुटुंबात मेडिकल इमर्जन्सी होती. माझी बहीण रुग्णालयात दाखल होती. असं असतानाही पापाराझींनी मला एअरपोर्टवर थांबवलं होतं. त्यांनी माझे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले होते’, असं तिने लिहिलं.
दिसण्यावरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल तिने पुढे लिहिलं, ‘मला समजलंय की या देशात माझ्या दिसण्यावरून आणि चेहऱ्यावरून चर्चा करण्यापेक्षा दुसरा कोणता मुद्दाच उरलेला नाही. माझे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल करण्यात आले. त्यावर लोकांनी अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी माझ्या दिसण्यावरून अत्यंत वाईट कमेंट्स केल्या. खरं सांगायचं झालं तर मला कोणत्याच चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यात काहीच रस नाही. मी माझं आयुष्य आनंदाने जगतेय आणि मला कधीच प्रकाशझोतात यायचं नाहीये. मला कोणत्याच प्रसिद्धीची हौस नाही आणि मला कोणत्याच चित्रपटात काम करायचं नाहीये. त्यामुळे शांत राहा. मोकळे राहा, माझ्याविषयी चिंता करणं सोडून द्या.’
ट्रोलर्सना फटकारत आयेशाने लिहिलं, ‘एक मुलगी किंवा महिला असल्याने लोकांची अपेक्षा असते की ती जशी किशोरवयात दिसत होती, तशीच ती 15 वर्षांनंतरही दिसावी. पण हे किती अवास्तविक आणि हास्यास्पद आहे. तुमच्याकडे असलेल्या मोकळ्या वेळेत चांगली दिसणारी महिला शोधण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करा. मला खूप चांगलं आयुष्य मिळालं आहे आणि मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. ज्या लोकांना त्याची गरज असेल, त्यांच्यासाठी ते वाचवून ठेवा. मी तुम्हाला तुमचीच वाईट ऊर्जा परत करतेय. आयुष्यात काहीतरी चांगलं करा, छंद बाळगा, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा, हसा आणि ते सर्व करा ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या आनंदी महिलेला तुम्हाला अपेक्षित असं दिसत नसल्याबद्दल कमेंट करायची गरज भासणार नाही.’