मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील आणि प्रसिद्ध ज्योतिषी पी. खुराना यांचं शुक्रवारी निधन झालं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुषमानचे वडील गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. मोहालीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चंदीगडमधील मनिमाजरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले जातील.
आयुषमानचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ‘आयुषमान आणि अपारशक्तीचे वडील पी. खुराना यांचं मोहालीमध्ये शुक्रवारी सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते,’ असं ते म्हणाले. आयुषमानचं त्याच्या वडिलांशी खूप खास नातं होतं. सोशल मीडियावर त्याने वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली होती. ‘आम्हाला हे सर्व त्यांच्याकडूनच मिळालं. शिस्त, संगीताबद्दलचं प्रेम, कविता, चित्रपट आणि कला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. पण ज्योतिषीमध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांच्यामुळेच माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा N आणि R आहे’, असं त्याने लिहिलं होतं.
पंडित पी. खुराना हे ज्योतिष क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. त्यांनी ज्योतिषशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. ज्योतिषाच्या क्षेत्रातील या ज्ञानामुळे त्यांना खूप मानसन्मान मिळाला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा वारसा शिल्पा धर यांच्याकडे सोपविला. शिल्पाने सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमान म्हणाला होता, “मला ज्योतिषशास्त्रात विश्वास नाही. पण माझे वडील हेच माझे प्रशिक्षक आणि गुरू आहेत. ते मला नेहमी म्हणायचे की, बाळा लोकांची आवड ओळख आणि मी तेच केलं.”