मुंबई- टी 20 वर्ल्ड कप मॅचमध्ये पाकिस्तानवरील भारताचा रोमहर्षक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण सामन्याशी निगडीत विविध किस्से, अनुभव सांगत आहेत. नुकतंच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सांगितलं की मॅच पाहण्यासाठी त्यांनी आपली फ्लाइट सोडली होती. त्यानंतर आता अभिनेता आयुषमान खुरानाने (Ayushmann Khurrana) एक किस्सा ट्विटरवर सांगितला आहे. भारत-पाक मॅच (IND vs PAK) पाहण्यासाठी मुंबई-चंदीगडची फ्लाइट पायलटने जाणूनबुजून पाच मिनिटं उशिरा केली, असं त्याने म्हटलंय. त्याचा हा किस्सा वाचून चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत.
रविवारी आयुषमान हा मुंबईहून चंदीगडला जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होता. त्याचवेळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अंतिम टप्प्यात होता. आयुषमानने लिहिलं, ‘ही कहाणी माझ्या पुढच्या पिढींसाठी आहे. माझं विमान हवेत उडण्याआधी मी मुंबई-चंदीगड फ्लाइटमध्ये शेवटचे दोन ओव्हर पाहिले. सर्व प्रवासी त्यांच्या फोनमध्ये मॅच पाहण्यात दंग होते. मला खात्री आहे की क्रिकेटवेड्या पायलटने जाणूनबुजून विमानाचं उड्डाण पाच मिनिटं उशिराने केलं आणि कोणालाच कसलीच तक्रार नव्हती.’
Indeed a story for the future generation. Lo maine bhi iss kahaani ko amar bana diya, @ayushmannk ❤️ pic.twitter.com/OdMhixY9Tq
— Joginder Tuteja (@Tutejajoginder) October 23, 2022
पाकिस्तान आणि भारतदरम्यान टी 20 वर्ल्ड कप मॅचच्या अखेरच्या काही क्षणांत जणू सर्वकाही जिथल्या तिथे थांबलं होतं. विराट कोहली हा भारताच्या दमदार विजयचा शिल्पकार ठरला. सामना जिंकताच विमानातील सर्व प्रवाशांनी एकच जल्लोष केल्याचं आयुषमानने पुढच्या पोस्टमध्ये लिहिलं. त्याचवेळी पायलटने टेक-ऑफची प्रक्रिया सुरू केली.
हा संपूर्ण किस्सा फोनच्या कॅमेऱ्यात कैद न केल्याची खंतसुद्धा त्याने बोलून दाखवली. त्याचप्रमाणे ते अभूतपूर्व क्षण अनुभवायला मिळाल्याचा आनंदही आयुषमानने व्यक्त केला. दिवाळीचा आनंद आणि जल्लोष एक दिवस आधीच देशवासियांना दिल्याबद्दल आयुषमानने विराट कोहलीचे आभार मानले.