मुंबई : प्रसिद्ध रॅपर बादशाहचं ‘सनक’ हे नवीन गाणं जवळपास महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालं होतं. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झालं. बादशाहच्या चाहत्यांना हे गाणं खूप आवडलं आणि युट्यूबवरही ते ट्रेंड होऊ लागलं होतं. मात्र आता गाणं प्रदर्शित झाल्याच्या महिनाभरानंतर त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशमधील उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिरातील एका ज्येष्ठ पुजाऱ्यांनी बादशाहच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यात भगवान शिवच्या नावाने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी आता बादशाहच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.
मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलं की बादशाहने गाण्यातून भगवान शिवचं नाव काढून टाकावं आणि माफी मागावी. बादशाहविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. बादशाहने त्याच्या गाण्यात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला असून त्यात शिवीगाळही असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर त्याने स्वत:ला शिवभक्त असल्याचं म्हटलं आहे. हिंदू संघटनांसह महाकाल सेना आणि पुजारी महासंघाने गाण्यातून भोलेनाथचं नाव तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात बादशाहचं ‘सनक’ हे 2 मिनिटं 15 सेकंदांचं गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं प्रदर्शित होताच ट्रेंड होऊ लागलं होतं. गाण्यात सुरुवातीच्या 40 सेकंदांनंतर बादशाहच्या तोंडून काही अश्लील शब्द ऐकू येतात. या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत 19 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससह अनेकांनी त्या गाण्यावर इन्स्टाग्राम रिल्स बनवून पोस्ट केले आहेत.
एकीकडे या गाण्याला सोशल मीडियावर पसंती मिळतेय तर दुसरीकडे भगवान शिवचे भक्त त्यावर नाराज झाले आहेत. पुजाऱ्यांच्या या मागणीबद्दल अद्याप बादशाहच्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
गेल्या काही दिवसांपासून बादशाहच्या गाण्यावरून वाद सुरू असताना त्याच्या खासगी आयुष्याबद्दलची जोरदार चर्चा आहे. बादशाह लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सातत्याने रंगत होती. अखेर त्यावर पोस्ट लिहित बादशाहने मौन सोडलं. “माझ्या लग्नाबद्दल जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये काही तथ्य नाही. ती फक्त आणि फक्त अफवाच आहे,” असं त्याने स्पष्ट केलं.