देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न केलं. शिव-शक्तीची पूजा, हळद, मेहंदी, लग्न, शुभ आशीर्वाद समारोह, मंगल उत्सव आणि अखेरीस कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शन असा पाच-सहा दिवसांचा हा शाही लग्नसोहळा होता. ‘वेडिंग ऑफ द इअर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या विवाहसोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकीय, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचसोबत विविध धार्मिक गुरूसुद्धा अनंत-राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. यामध्ये बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचाही समावेश होता. धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात हा अनुभव सांगितला. ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने त्यांनी सुरुवातीला लग्नाला येण्यास नकार दिला होता. मात्र मुकेश अंबानी यांनी खास व्यवस्था करून त्यांना भारतात बोलावून घेतलं होतं.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “भारतात ठाकुरजींचे लाडके श्री अनंत अंबानी यांचा आशीर्वाद समारोह होता. मी तर त्यांना नकार दिला होता, कारण मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. मी आशीर्वाद समारोहाला पोहोचू शकणार नाही, असं सांगितलं होतं. नंतर कधीतरी अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देईन, असं म्हटलं होतं. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. म्हणाले, गुरूजी तुम्ही या, आम्ही तुमच्यासाठी विमान पाठवतो. मी हनुमानजींचं नाव घेतलं आणि विमानातून आलो. तिथे पोहोचायला 12 तास लागले. पोहोचल्यानंतर प्रसाद घेतला, आराम केला. संध्याकाळी सर्व साधू-संत तिथे पोहोचले होते. शंकराचार्य यांच्यासह इतरांचंही दर्शन घेतलं. नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला आणि तिथून निघालो.”
बागेश्वर धाम सरकारच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये धीरेंद्र शास्त्री हे अनेकांची भेट घेताना दिसत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, संजय दत्त हे बॉलिवूड कलाकारसुद्धा दिसले. अमिताभ आणि जया बच्चन, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, शाहरुख आणि गौरी खान, तमिळ सुपरस्टार रजनीकांत, हॉलिवूड अभिनेता आणि डब्ल्युडब्ल्युई फेम जॉन सीना, सलमान खान, संजय दत्त, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, बाबा रामदेव, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांसह इतर अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.