सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचाच (South Films) बोलबाला आहे. अनेक दक्षिण भारतीय कलाकार हे आता पॅन इंडिया (संपूर्ण देशात) स्टार बनले आहेत. या कलाकारांची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पहायला मिळते. ज्याप्रकारे साऊथच्या कलाकारांची लोकप्रियता वाढत आहे, त्यामुळे लोकांमध्ये या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकतासुद्धा वाढली आहे. आतापर्यंत तुम्ही केजीएफ स्टार यश (Yash) आणि बाहुबली फेम प्रभास (Prabhas) अशी नावं ऐकली असतील. पण या कलाकारांची पूर्ण नावं काय आहेत ते जाणून घेऊयात..
बाहुबली चित्रपटातून संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता प्रभासचं पूर्ण नाव तुम्हाला माहितीये का? देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या प्रभासचं पूर्ण नाव ‘उप्पलपती व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू’ असं आहे.
केजीएफ चाप्टर 1 आणि चाप्टर 2 मधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता यश हा देशभरात रॉकी भाई या नावानेच ओळखला जातो. केजीएफ या चित्रपटात त्याच्या भूमिकेचं नाव रॉकी भाई असं आहे. पण यशचं पूर्ण नाव यश गौडा असून त्याचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे.
RRR चित्रपटामुळे अभिनेता ज्युनियर एनटीआरची देशभरात लोकप्रियता वाढली आहे. मात्र त्यापूर्वी दक्षिणेत ज्युनियर एनटीआर हा अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. त्याचं पूर्ण नाव ‘नंदामुरी तारका रामाराव’ असून हे नाव फारच कमी लोकांना माहीत असेल.
अभिनेता राम चरणचं नाव देखील दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत घेतलं जातं. रामचरणचं पूर्ण नाव कोनिडेला रामचरण तेजा असं आहे. रामचरण हा मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे.
चिरंजीवी हे संपूर्ण देशभरातील लोकप्रिय अभिनेते आहेत. चाहते त्यांना चिरंजीवी या नावानेच ओळखतात. पण त्यांचं पूर्ण नाव ‘कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद’ असं आहे.