सध्या ओटीटीचा जमाना आहे आणि प्रत्येकाला घरबसल्या किंवा मोबाइलवर मनोरंजन हवं असतं. ओटीटीचं जाळं जसजसं पसरत जातंय, तसतशी कंटेटबद्दलची लोकांची पसंतसुद्धा बदलत जातेय. रोमँटिक, कॉमेडी, ॲक्शन यांसोबतच आता विविध जॉनर आणि देशांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक वीकेंडला ओटीटीवर नव्याने चित्रपट किंवा सीरिज दाखल होतो. या वीकेंडला ओटीटीवर काय बघावं, या विचारात असाल तर एकदा ही यादी पहा..
बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड- एस. एस. राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ची ॲनिमेशन सीरिज येत्या 17 मे रोजी ओटीटीवर येणार आहे. माहिष्मतीच्या सिंहासनासाठी होणारी ही लढाई प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले होते. आता एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.
जरा हटके जरा बचके- अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा हा चित्रपट जर तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकला नसाल तर तो आता ओटीटी पाहू शकता. हा कॉमेडी चित्रपट 17 मे रोजी जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. जवळपास वर्षभरानंतर हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. 2 जून 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण वर्षभर या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकत घेण्यासाठी कोणी तयार होत नव्हतं.
बस्तर: द नक्सल स्टोरी- ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माचा हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. येत्या 17 मे रोजी हा चित्रपट झी5 वर स्ट्रीम होणार आहे. हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येईल. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादी-माओवादी बंडखोरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
गॉडझिल X काँग: द न्यू एम्पायर- मेटाव्हर्स फ्रँचाइजीचा हा पाचवा अमेरिकन मॉन्स्टर चित्रपट 13 मे पासून प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘क्वीन’, ‘कलवान’, ‘क्रॅश’ आणि नेटफ्लिक्सवर ‘मॉन्स्टर’ आणि ‘मॅडम’ यांसारखे चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत.