अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात चिमुकल्या मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हर्षाली इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिथे ती विविध फोटो आणि रिल्स पोस्ट करत असते. यावरून अनेकदा तिला ट्रोलसुद्धा केलं जातं. आता त्या ट्रोलर्सना हर्षालीने सडेतोड उत्तर दिलं आहे. दहावीच्या निकालातील टक्केवारी सांगत हर्षालीने टीका करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. नुकताच दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला. त्यात हर्षालीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निकालातील टक्केवारी सांगत हर्षालीने अभिनय, कथ्थक डान्स आणि अभ्यास या सर्वांत समतोल साधत असल्याचं म्हटलंय. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
या व्हिडीओमध्ये हर्षालीने तिला सतत येणाऱ्या कमेंट्सपैकी काही कमेंट्स दाखवले आहेत. ‘तू शाळेत तरी जातेस का?’, ‘तू दहावीत आहेस, अभ्यास कर नाहीतर नापास होशील’, ‘तू कथ्थकच शिकत बसशील तर दहावीत पास कशी होणार?’, ‘तू फक्त इन्स्टाग्राम रील्स बनवतेस का? अभ्यास करत नाहीस का?’ असे सर्व प्रश्न ती एकानंतर एक बाजूला सारते आणि त्यानंतर म्हणते, ‘तुम्ही सर्वांनी इतकी काळजी दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. मी दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळवले आहेत.’
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हर्षालीने लिहिलंय, ‘माझ्या मुद्रा अचूकपणे करण्यापासून ते शालेय शिक्षणात दमदार कामगिरी करेपर्यंत.. मी माझ्या कथ्थक क्लासेस, शूट्स आणि अभ्यास यात परफेक्ट समतोल साधतेय. या सर्वांचा रिझल्ट काय आला? तर 83 टक्के. कोण म्हणतं की तुम्ही तुमच्या रिल आणि रिअल आयुष्यात एकाच वेळी चांगलं काम करू शकत नाही? ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास केला आणि सतत मला पाठिंबा दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानते.’ त्याचसोबत हर्षालीने तिच्या सर्व टीकाकारांचेही आभार मानले आहेत.
हर्षालीने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती फक्त 7 वर्षांची होती. या चित्रपटात तिने सलमान खान, करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यासोबत काम केलंय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला होता.