मुंबई: ‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अविकाने मालिकेत काम केल्यानंतर काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर आता तिने बॉलिवूडकडे मोर्चा वळविला आहे. आगामी ‘1920 : हॉरर ऑफ द हार्ट्स’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अविकाच्या अभिनयाचं आणि तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं नेटकऱ्यांकडून कौतुक झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचा ‘फॅट टू फिट’ प्रवास कसा झाला, याविषयी सांगितलं आहे.
“मी जेव्हा लाडो-2 या मालिकेत काम करत होती, तेव्हा माझं वजन खूप वाढलं होतं. माझ्या चाहत्यांना आणि मित्रमैत्रिणींना असं वाटायचं की मला प्रकृतीबाबत काही समस्या आहेत. ज्यामुळे माझं वजन वाढत चाललंय. मात्र असं काहीच नव्हतं. मी खूप आळशी होते. मी खूप जंक फूड खायचे. मी विचार केला की तेव्हासुद्धा चाहते माझ्यावर प्रेमाचा इतका वर्षाव करत होते, तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं. अभिनेत्री असल्याने दिसण्यावर खूप भर द्यावा लागतो. आपल्या चाहत्यांना आम्ही प्रोत्साहन देणार नाही तर कोण देणार? हाच सगळा विचार करत मी फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली”, असं अविकाने सांगितलं.
वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी ती पुढे म्हणाली, “एकेकाळी माझं वजन 70-74 किलोपर्यंत पोहोचलं होतं. मला स्वत:ला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता माझं वजन 52-55 दरम्यान असतं. मी व्यवस्थित खाऊन-पिऊन वजन कमी केलं आहे. यासाठी कोणताच डाएट चार्ट फॉलो केला नाही. खाण्यातसुद्धा मी काही पथ्य पाळले नाहीत. कारण मी स्वत: खवय्यी आहे. मात्र वजन कमी करायला मला दोन वर्षांचा काळ लागला. मी डाएटपेक्षा जास्त भर व्यायामावर दिला. त्यातही मी अधिकाधिक चालायची.”
‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले.