“एकाच व्यक्तीशी 7 वेळा लग्न, 3 वेळा मरून पुन्हा जिवंत झाले”; ‘बालिका वधू’ फेम अविका असं का म्हणाली?

| Updated on: Jun 12, 2023 | 9:10 AM

‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे.

एकाच व्यक्तीशी 7 वेळा लग्न, 3 वेळा मरून पुन्हा जिवंत झाले; बालिका वधू फेम अविका असं का म्हणाली?
Avika Gor
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री अविका गौरने फार कमी वयात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नाव कमावलं. बालकलाकार म्हणून तिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘बालिका वधू’ या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आनंदीची भूमिका साकारून अविका घराघरात पोहोचली. या मालिकेनंतर तिने ‘ससुराल सिमर का’ यामध्येही बरेच महिने काम केलं होतं. टीव्ही इंडस्ट्रीतील या लोकप्रिय मालिका होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविकाने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी पश्चात्ताप व्यक्त केला. या मालिकेच्या कथेवर आणि त्यातील काही सीन्सवर तिने प्रतिक्रिया दिली.

“तू तुझ्या करिअरमध्ये अशी कोणती भूमिका केलीस का, ज्यामुळे नंतर तुला प्रश्न पडला की ती तू का स्वीकारलीस”, असा प्रश्न अविकाला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तिने ससुराल सिमर का या मालिकेचा उल्लेख करत तिने साकारलेल्या रोलीच्या भूमिकेचं नाव घेतलं. ती म्हणाली, “त्या मालिकेत माझ्या भूमिकेसोबत बरंच काही घडलं होतं. मी भूताला म्हणाले की कायदा आपल्या हातात घेऊ नकोस. माझ्या पोटात त्रिशूळ घुसवलं गेलं. ज्या ज्या अशक्य गोष्टी होत्या, त्या सर्व माझ्यासोबत घडल्या होत्या. मी तीन वेळा मरून पुन्हा जिवंत झाले. 50 वेळा माझं अपहरण झालं तर एकाच व्यक्तीशी मी सहा ते सात वेळा लग्न केलं.”

हे सुद्धा वाचा

मालिकेविषयी बोलतानाच अविकाने टीव्ही अभिनेत्री म्हणून अभिमान असल्याचं सांगितलं. “प्रत्येक टीव्ही कलाकाराला स्वत:वर अभिमान असायला हवा. मला स्वत:ला टीव्ही अभिनेत्री असल्याचा अभिमान आहे”, असं ती म्हणाली. अविका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी ‘1920 : हॉरर ऑफ द हार्ट्स’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अविकाच्या अभिनयाचं आणि तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं नेटकऱ्यांकडून कौतुक झालं.

‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले.