मुंबई: ‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दाने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कलर्स टीव्हीवरील ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. या मालिकेत नेहाने गहनाची भूमिका साकारली होती. आता तीच गहना खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या दहा वर्षांनंतर हा आनंद मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली. नेहाने मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
‘बालिका वधू’ या मालिकेमुळे नेहा प्रकाशझोतात आली. आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. नेहाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. पतीसोबतचा हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम.. अखेर माझ्या शरीरात देव आलाच. 2023 मध्ये चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.’
या कॅप्शनवरून नेहाची डिलिव्हरी ही नवीन वर्षात होणार असल्याचं कळतंय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून नेहा बेबी प्लॅनिंग करत होती. अखेर 10 वर्षांनंतर तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्याचा आनंद नेहाच्या या पोस्टमध्ये सहज पहायला मिळतोय.
नेहाने 2012 मध्ये आयुषमानशी लग्न केलं. तिने आतापर्यंत बालिका वधू, डोली अरमानों की आणि क्यू रिश्तों मे कट्टी-बट्टी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने झलक दिखला जा या डान्स रिॲलिटी शोच्या आठव्या पर्वातही भाग घेतला होता. फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडीच्या आठव्या सिझनमध्ये तिने काही एपिसोड्ससाठी हजेरी लावली होती.