Oppenheimer | भगवद् गीतेच्या संदर्भामुळे भारतात ‘ओपनहायमर’चं जबरदस्त कलेक्शन? 4 दिवसांत तगडी कमाई

| Updated on: Jul 24, 2023 | 11:35 AM

'ओपनहायमर' या चित्रपटाचा भारतात इतका मोठा प्रेक्षकवर्ग असण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटात भगवद् गीतेचा संदर्भ असल्याने अनेकांना कथेविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली. मात्र त्याच सीनवरून देशात वादही सुरू झाला.

Oppenheimer | भगवद् गीतेच्या संदर्भामुळे भारतात ओपनहायमरचं जबरदस्त कलेक्शन? 4 दिवसांत तगडी कमाई
Oppenheimer
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई | 24 जुलै 2023 : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची भारतात प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. भारतात त्याची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा झाली होती. काही शहरांमध्ये एक तिकिट तब्बल दोन हजार रुपयांवर विकलं गेलं. ख्रिस्तोफर नोलनचा मोठा चाहतावर्ग ज्या ज्या देशात आहे, तिथे या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. 1930 आणि 40 च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याचा अमेरिकेच्या गुप्त ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’वर आधारित हा चित्रपट आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नजरेतून ही कथा सांगितली जात आहे. ते अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. यामध्ये सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. ‘ओपनहायमर’सोबतच ‘बार्बी’सुद्धा प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगली टक्कर पहायला मिळत आहे. या चित्रपटात सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबतच एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, फ्लॉरेन्स पग, जोश हार्टनेस, केसी अफ्लेक, रामी मालेक आणि केनेथ ब्रनाघ यांच्याही भूमिका आहेत.

ओपनहायमरची भारतातील कमाई-

पहिला दिवस- 14.50 कोटी रुपये
दुसरा दिवस- 17.25 कोटी रुपये
तिसरा दिवस- 17.25 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

भगवद् गीतेच्या संदर्भामुळे आकर्षण?

‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा भारतात इतका मोठा प्रेक्षकवर्ग असण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटात भगवद् गीतेचा संदर्भ असल्याने अनेकांना कथेविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली. मात्र त्याच सीनवरून देशात वादही सुरू झाला. चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद् गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी दिग्दर्शन नोलनला एक खुलं पत्र लिहिलं आहे.

भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानलं जातं. त्यांनी संस्कृत भाषा शिकली होती आणि त्यांच्यावर भगवद् गीतेचा खूप प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. ‘ओपनहायमर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिलियन मर्फीने सांगितलं होतं की त्याने चित्रपटाची तयारी करताना भगवद् गीता वाचली होती. ‘गीतेतील मजकूर अत्यंत सुंदर आणि खूप प्रेरणादायी वाटले’, असं तो म्हणाला होता. त्याच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.