मुंबई: ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारून अभिनेत्री सौम्या टंडन घराघरात पोहोचली. मात्र गेल्या काही काळापासून ती अभिनयविश्वापासून दूर आहे. 2020 मध्ये सौम्याने या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत तिच्या भूमिकेचे चाहते झाले होते. आता सौम्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सौम्याने तिच्यासोबत घडलेल्या छेडछाडीचा भयंकर प्रसंग सांगितला. या घटनेमुळे ती पूर्णपणे खचली होती. सौम्यासोब ही घटना उज्जैनमध्ये घडली होती. एका व्यक्तीने भर रस्त्यात सौम्याच्या भांगेत सिंदूर भरला होता. तर आणखी एका घटनेत एका मुलाने तिला ओव्हरटेक केला आणि सौम्या तिथेच पडली.
“हिवाळ्याचे दिवस होते. रात्रीच्या वेळेस मी घरी परतत होते, तेव्हा एका मुलाने बाईक थांबवून माझ्या भांगेत सिंदूर भरला. आणखी एक घटना मी शाळेत असताना घडली होती. मी शाळेतून सायकलवरून घरी येत होते, तेव्हा एका मुलाने मला ओव्हरटेक केलं. त्यामुळे मी सायकलवरून पडली आणि माझ्या डोक्याला खूप मार लागला. माझी हाडंही फ्रॅक्चर झाली. ”
सौम्याने सांगितलं की ती वेदनेनं विव्हळत होती आणि ओरडत होती. मात्र कोणीच तिच्या मदतीला धावून आलं नाही. ती उज्जैनमध्ये जेवढा काळ राहिली, तेवढा काळ तिचा स्वत:च्या सुरक्षेवरच लक्ष केंद्रीत करावं लागल्याचं सौम्या म्हणाली. कधी रस्त्यावर मुलं तिचा पाठलाग करायचे, तर कधी भिंतींवर तिच्याविषयी बरंवाईट लिहायचे.
सौम्याने तिच्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये ‘खुशी’ या अफगाणी मालिकेतून केली. त्यानंतर तिने काही शोजचं सूत्रसंचालन केलं. तिने ‘जब वी मेट’ या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र सौम्याला खरी ओळख ही ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून मिळाली.
करिअरच्या सुरुवातीला सौम्याला बऱ्याच नकाराचा सामना करावा लागला होता. अनेकदा गोरेपणामुळेही नकार झेलल्याचं सौम्याने सांगितलं. “ऑडिशनमध्ये मला म्हणायचे की मी भारतीय नाही आणि सर्वसामान्यांपेक्षा जरा जास्तच गोरी आहे. म्हणून ते मला साइन करायचे नाही”, अशा शब्दांत तिने दु:ख व्यक्त केलं.
सौम्याने ‘जोर का झटका’, ‘बोर्नविटा क्विझ’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ हे शो होस्ट केले आहेत. अनेक शो होस्ट केल्यानंतर तिने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत काम केलं. या शोमधली ‘गोरी मॅम’ अर्थात ‘अनिता भाभी’ ही तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. या पात्राने सौम्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एवढंच नाही तर, या व्यक्तिरेखेसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.