‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली. शिल्पा शिंदेनंतर अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगीची वर्णी लागली. शिल्पाचा चाहतावर्ग असतानाही शुभांगीने आपल्या दमदार अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली. या मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या शुभांगीच्या खऱ्या आयुष्यात मात्रं तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. शुभांगीचं लग्न कमी वयातच झालं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिने पियुष पुरे याच्याशी लग्न केलं होतं. तब्बल 19 वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले. या दोघांना 18 वर्षांची मुलगी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाविषयी तिचं मत मांडलंय.
“लॉकडाऊनमध्ये आम्हाला समजलं की आम्ही दोघं एकमेकांपासून खूप वेगळे आहोत आणि हे नातं आता फार काळ टिकू शकत नाही. आम्ही संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तरीही या नात्याला तडा गेलाच. माझं असं मत आहे की नात्याला वाईट वळणावर घेऊन जाण्यापेक्षा आपण एका टप्प्यानंतर पूर्णविराम दिला पाहिजे. घटस्फोटानंतर मी आता खुश आहे. विवाहित असताना मी ज्या गोष्टी करू शकत नव्हती, त्या मी आता करतेय”, असं शुभांगी म्हणाली.
यावेळी दुसऱ्या लग्नबद्दल विचारलं असता शुभांगी पुढे म्हणाली, “दुसऱ्या लग्नासाठी मला कुटुंबीयांकडून काही दबाव नाही. मीसुद्धा आता कोणत्याच रिलेशनशिपमध्ये नाही. पुन्हा लग्न करण्याची माझी इच्छाही नाही. माझं कोणावर प्रेमही नाही किंवा कोणी मला प्रपोज केलेलं नाही. माझं लग्न कमी वयात झाल्याने मी आईसुद्धा लवकर झाले होते. माझी 18 वर्षांची मुलगी आहे, ती अमेरिकेत तिचं शिक्षण पूर्ण करतेय. माझी मुलगी माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतंय.”
शुभांगीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. या मालिकेत तिने पलचीन बासूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसो का जोडा’ यांसारख्या मालिकेत काम केलं होतं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे शुभांगीला आणखी लोकप्रियता मिळाली.