मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने 2003 मध्ये पियुष पूरेशी इंदूरमध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून शुभांगी आणि पियुष वेगवेगळे राहत असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आता पुन्हा एकत्र येण्याची आशाच उरली नाही, असं शुभांगी म्हणाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
“जवळपास वर्षभरापासून आम्ही एकत्र राहत नाही. आमचा संसार वाचवण्यासाठी पियुष आणि मी खूप प्रयत्न केले. एकमेकांचा आदर, साथ, विश्वास आणि मैत्री हे मजबूत लग्नाचा पाया असतात. मात्र जसजशी वेळ पुढे निघून गेली, तसतसं आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांमधील वाद मिटवू शकत नाही आहोत. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला”, असं शुभांगी म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी अजूनही हे सर्व खूप कठीण आहे. माझ्यासाठी कुटुंब हेच प्राध्यान आहे. मात्र काही जखमा भरल्या जात नाहीत. जेव्हा इतक्या वर्षांचं नातं तुटतं, तेव्हा मानसिक आणि भावनिक परिणाम नक्कीच होतो. माझ्यावरसुद्धा परिणाम झाला पण मी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक स्थिरतेला आता प्राधान्य असेल. प्रतिकूल परिस्थिती नेहमीच तुम्हाला काहीतरी शिकवून जाते, असा माझा विश्वास आहे.”
विभक्त झाल्यानंतर पियुष त्याच्या मुलीला भेटायला दर रविवारी येतो. मुलगी सध्या शुभांगीसोबतच राहत आहे. शुभांगीने 2006 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तिने कस्तुरी आणि चिडिया घर यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. भाभीजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली.
शुभांगी अत्रेच्या घटस्फोटाविषयी कळताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. ‘हे खूपच धक्कादायक आहे, प्रेमावर विश्वास ठेवायचा की नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तुम्ही माझ्या आवडत्या अभिनेत्री आहात. असं नेमकं काय घडलं’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.