पुणे : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेयचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील वाकड इथं आढळला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावूक पोस्ट लिहिली आहे. मधू मार्कंडेयच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मधू ही भाग्यश्रीची मोठी बहीण होती. वाकड परिसरात ती मैत्रिणीसोबत केक बनवण्याचा व्यवसाय करते. रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसोबत भाडेतत्वावर रुम पाहण्यासाठी गेली होती. मात्र रुम पाहिल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि दातखिळी बसली.
मधूच्या मैत्रिणीने तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथे तिचा उपचार होऊ शकला नाही. त्यानंतर तिला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता, तपासानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मधूच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने काही घातपात झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मधूच्या कुटुंबीयांनीही हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
बहिणीच्या निधनाने भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल,’ असं तिने एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
दुसऱ्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये भाग्यश्रीने लिहिलं, ‘माझ्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला. माझ्यासाठी तुझं महत्त्व काय होतं हे मी शब्दांत मांडू शकत नाही. माझी आई, बहीण, मैत्रीण, माझा आत्मविश्वास आणि बरंच काही.. माझ्या विश्वाचं केंद्र तूच होतीस. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवून गेली आहे. तुझ्याशिवाय मी कसं जगू, हे तू मला शिकवलंस नाही. मृत्यू टाळता येत नाही, पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.’
भाग्यश्रीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो’, असं काहींनी म्हटलंय. तर अनेकांनी नेमकं काय झालं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाग्यश्रीने ‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.