Salim Ghouse: ‘भारत एक खोज’चे अभिनेते सलीम घौस यांचं निधन

| Updated on: Apr 28, 2022 | 4:27 PM

सलीम (Salim Ghouse) यांनी 1978 मध्ये 'स्वर्ग नरक' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी चक्र (1981), 'सारांश' (1984), 'मोहन जोशी हाजिर हो' (1984) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

Salim Ghouse: भारत एक खोजचे अभिनेते सलीम घौस यांचं निधन
Salim Ghouse
Image Credit source: Twitter
Follow us on

हिंदी चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते सलीम घौस (Salim Ghouse) यांचे आज (28 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ‘मंथन’, ‘कलयुग’, ‘चक्र’, ‘सारांश’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘त्रिकाल’, ‘आघात’, ‘द्रोही’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. सलीम यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ‘द फॅमिली मॅन’मधील अभिनेता शारिब हाश्मी (Sharib Hashmi) याने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. ‘पहिल्यांदा सलीम घौस साहेबांना ‘सुबह’ (Subah) या मालिकेत पाहिलं होतं. त्यांचं काम मला खूप आवडलं होतं, त्यांचा आवाज..’, अशा शब्दांत शारिबने भावना व्यक्त केल्या.

सलीम यांनी 1978 मध्ये ‘स्वर्ग नरक’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी चक्र (1981), ‘सारांश’ (1984), ‘मोहन जोशी हाजिर हो’ (1984) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मंथन, कलयुग, त्रिकाल, आघात, द्रोही, थिरुदा थिरुदा, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर, अक्स या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. चित्रपटांसोबतच ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही प्रसिद्ध होते.

शारीब हाश्मीचं ट्विट-

श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ या टीव्ही सीरिजमध्ये त्यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारली होती. ‘वागले की दुनियाँ’ (1988) या सिटकॉममध्येही त्यांनी काम केलं होतं. विविध मालिकांमध्ये त्यांनी राम, कृष्ण यांच्याही भूमिका साकारल्या होत्या. थिएटरमध्येही ते प्रसिद्ध कलाकार होते. सलीम यांनी किम, द परफेक्ट मर्डर, द डिसिव्हर्स, महाराजास डॉटर आणि गेटिंग पर्सनल यांसारख्या काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केलं होतं.