भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललंय. वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आकांक्षाचा मृतदेह आढळला.
अचानक समोर आलेल्या या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये जन्मलेल्या आकांक्षाने कमी वयात प्रसिद्धी मिळवली.
आकांक्षा आधी टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करायची. 2019 मध्ये 'मेरी जंग मेरा फैसला' या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. यामध्ये तिने खेसारी लाल यादवसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने निरहुआ आणि पवन सिंग यांसारख्या भोजपुरी इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.
एकीकडे आकांक्षाच्या आत्महत्येची बातमी समोर येताच दुसरीकडे तिचं पवन सिंहसोबतचं नवीन गाणंसुद्धा प्रदर्शित झालं. 'ये आरा कभी नहीं हारा' असं या गाण्याचं शीर्षक आहे. आकांक्षा लवकरच 'एक दिन की सास' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती.
आकांक्षाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आजच जाहीर होणार होती. यामध्ये तिने अभिनेता समर सिंहसोबत भूमिका साकारणार होती. या दोघांनी नुकतंच रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.