बिहार : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बक्सरमधील हेठुआ गावात प्रसिद्ध भोजपुरी गायक ब्रजेश सिंहचा टिळक समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता रितेश पांडे, शिल्पी राज, निशांत सिंह, नेहा राज, विजय चौहान, मुकेश मिश्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ब्रजेशच्या टिळक समारोहात जोरदार परफॉर्मन्स सुरू होते. मात्र त्याचवेळी असं काही घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
टिळक समारोहाचा जल्लोष सुरू असताना त्याठिकाणी अचानक गोळीबार झाला. त्यामुळे जमावात उपस्थित असलेल्या एका 13 वर्षीय मुलाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्चच्या रात्री घडली. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये रितेश पांडेसह अनेक कलाकार स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत. त्यादरम्यान अचानक फायरिंग होते आणि एका मुलाच्या पायाला गोळी लागते. संबंधित मुलावर दोन दिवस उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी 14 मार्च रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घेऊन राजापूर पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी 13 वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टमनंतर एफआयआरसाठी अर्ज करू अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.
“गोळीबारात कोणीतरी जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र कोणीही लेखी अर्ज दिला नव्हता. त्यामुळेच एफआयआर नोंदवला गेला नाही. मात्र उपचारानंतर मुलाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतर नातेवाईक या घटनेबाबत अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली.