मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. आता पहिल्या दिवशी ‘भोला’ची कमाई किती होणार, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, संजय मिश्रा, आमला पॉल आणि दीपक डोब्रियाल यांच्या भूमिका आहेत. भोला या चित्रपटाचा बजेट जास्त असला तरी त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र या चित्रपटातील कलाकारांना किती फी मिळाली, याची माहिती समोर आली आहे.
अजय देवगणने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे आणि त्यानेच दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. अजयने ‘भोला’साठी जवळपास 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री आमला पॉलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र तिला अत्यंत कमी मानधन मिळाल्याचं समजतंय. आमलाला या चित्रपटासाठी फक्त 25 लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे. आमलाची भूमिका छोटी असल्याने तिचं मानधन कमी असल्याचं म्हटलं जातंय.
या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूला जवळपास चार कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय संजय मिश्राला 85 लाख रुपये आणि दीपक डोब्रियालला 65 लाख रुपये मानधन मिळालं आहे. भोलाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. भगवदगीता, भस्म आणि त्रिशूळ या टीझरमधल्या विशिष्ट गोष्टींनी अजयच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती.
19 मार्चपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांतच आयमॅक्स आणि 4 डीएक्स व्हर्जनसह संपूर्ण देशात जवळपास 1200 तिकिटं विकली गेली होती. त्यामुळे या नऊ दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे दमदार कमाई झाल्याचं कळतंय.
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो. मात्र पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात तो अडकतो.
भोला या चित्रपटाच्या माध्यमातून आमला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये काम करतेय. आमला ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आमलाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तर दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.