मुंबई: अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. यासोबतच अजय त्याच्या एका नव्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द अजयनेच केलं असून त्यानेच मुख्य भूमिका साकारली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या टीझरच्या सुरुवातीला अनाथाश्रमातील एक महिला ज्योती नावाच्या लहान मुलीला शोधत असते. दुसऱ्या दिवशी तिला कोणीतरी भेटायला येणार आहे, असं ज्योतीला ती महिला सांगते. आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याशिवाय अजून कोण नातेवाईक असतं, असा प्रश्न त्या ज्योतीला पडतो. त्यानंतर टीझरमध्ये अजयची झलक पहायला मिळते. तुरुंगात भगवदगीता वाचत असलेल्या एका कैदीला बाहेर जायची वेळ आली आहे असं सांगण्यात येतं. हा कैदी दुसरा-तिसरा कोणी नसून अजयच असतो.
“तो कुठून आला आहे आणि कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. ज्यांना माहीत झालं, ते जिवंत राहिले नाही”, असं दुसरा कैदी त्याच्याविषयी बोलत असतो. तो जेव्हा कपाळावर भस्म लावतो, तेव्हा लोकांना भस्मसात करतो, असं म्हटलं जातं, असाही एक संवाद या टीझरच्या अखेरीस ऐकायला मिळतं. अजय देवगणच्या जबरदस्त ॲक्शन सीनने या टीझरचा शेवट होतो. यावेळी त्याच्या हातात त्रिशूळ पहायला मिळतं.
भगवदगीता, भस्म आणि त्रिशूळ या टीझरमधल्या विशिष्ट गोष्टींनी अजयच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या टीझरवर अनेकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ‘खूप छान, अजून प्रतीक्षा करू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया अभिषेक बच्चनने दिली.
कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो. मात्र पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात तो अडकतो.
भोला या चित्रपटात आमला पॉल या अभिनेत्रीचीही भूमिका आहे. दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.