मुंबई : अभिनेत्री भूमिका चावला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भूमिकाने सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 2020 मध्ये मुंबईतल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून बरेच दिवस सावरले नव्हते, अशी प्रतिक्रिया भूमिकाने दिली. त्याचसोबत सुशांतसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता, याविषयीही ती व्यक्त झाली.
“एम. एस. धोनी या चित्रपटासाठी शूटिंग करताना आम्हा दोघांचे सीन्स एकत्र फार दिवस नव्हते. रांचीमधील काही सीन्स आम्ही एकत्र शूट केले होते. तेव्हा सुशांत त्याच्या आयुष्याविषयी आणि इतर बऱ्याच गोष्टींविषयी गप्पा मारायचा. आपण सर्वजण माणूस आहोत, सर्वांच्या आत काही भावना दडलेल्या असतात, हे मला त्यावेळी जाणवलं. माझा मुलगा तेव्हा फक्त एक वर्षाचा होता आणि मी शूटिंगदरम्यान सुशांतच्या गप्पा ऐकत बसायचे”, असं भूमिका म्हणाली.
सुशांतच्या मृत्यूबद्दल जेव्हा भूमिकाला कळलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला. “त्या धक्क्यातून मी बरेच दिवस सावरले नव्हते”, असं तिने सांगितलं. त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचं वृत्त ज्याप्रकारे त्यावेळी माध्यमांमध्ये कव्हर केलं गेलं, त्याविषयीही भूमिका मोकळेपणे व्यक्त झाली.
ती पुढे म्हणाली, “एकाने आपला जीव गमावला आहे आणि दुसरीकडे ज्या गोष्टी किंवा थिअरी बाहेर येत होत्या, मग ते बॉलिवूड असो, घराणेशाही असो किंवा मग ड्रग्ज.. या सर्वांमुळे फक्त गोंधळ वाढत गेला. रात्री 9 वाजताचा प्राईम टाईम शो हा कुटुंबीयांसोबत जेवताना बघण्याचा शो असायचा. पण त्यावेळी हे सर्व जणू एखाद्या सासू-सुनेच्या मालिकेच्या एपिसोडसारखं झालं होतं. प्रत्येक वाहिनी फक्त त्या एका गोष्टीमागे धावत होती. हे सर्व ते करत होते? देशात नेमकं काय घडतंय आणि काय घडत नाहीये हे त्यांना सांगायचं नव्हतं का किंवा त्यांच्याकडे चर्चेसाठी दुसरा कोणता मुद्दाच उरला नव्हता किंवा त्यांना दुसरीकडे लक्ष केंद्रीत करायचं होतं?”
देशात कोरोना महामारीची लाट आलेली असताना सुशांतने आपला जीव गमावला. “हे सर्व चार महिन्यांपर्यंत तसंच सुरू होतं. तुम्ही जनतेला कोर्ट चालवायला देऊ शकत नाही. आधी तुम्ही ती केस सोडवा आणि मग लोकांना सांगा. या प्रकरणात कुठेच शालिनता नव्हती”, अशा शब्दांत भूमिकाने फटकारलं. “सुशांत खूपच तरुण होता आणि दुर्दैवाने तो बऱ्याच वादांमध्ये अडकला होता, त्यामुळे त्याच्या निधनाने माझ्यावर खूप परिणाम झाला. कुणी म्हटलं की तो एकटा होता, कुणी म्हटलं की तो नैराश्यात होता. मला माहीत नाही की नेमकं काय झालं होतं,” असं ती म्हणाली.