मुंबई : सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमिका चावला नुकतीच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिने पूजा हेगडेच्या वहिनीची भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत भूमिकाने तिच्या करिअरविषयी बरेच खुलासे केले आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी करीना कपूरच्या आधी तिची निवड झाल्याचं भूमिकाने यावेळी सांगितलं. याचसोबत भूमिकाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याही एका चित्रपटाविषयी खुलासा केला.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात ती भूमिका साकारणार होती. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीच त्यांनी बाजीराव मस्तानीची प्लॅनिंग केली होती. भन्साळींनी याबद्दल सांगितलं होतं की ते हा चित्रपट सलमान आणि शाहरुख खान यांच्यासोबत करायचा होता. मात्र ते शक्य झालं नाही. आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत भूमिकाने सांगितलं की तिलासुद्धा चित्रपटातील एका भूमिकेसाठी ऑफर मिळाली होती. त्यासाठी तिने स्क्रीन टेस्टसुद्धा दिली होती.
भूमिकाने पुढे सांगितलं, “ही खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. तेरे नाम या चित्रपटानंतर लगेचच मी स्क्रीन टेस्ट दिली होती. मी सरांसोबत त्यांच्याच अंदाजात फोटोशूट केलं होतं. माझ्या साडीवर तूप आणि तेल पडल्याने त्याला आग लागली होती. मी पणत्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे पकडलं होतं आणि ते माझ्या हातून निसटले. त्यावेळी मी सिल्क साडी नेसली होती. मला नीट आठवतंय की तेव्हा काय घडलं होतं?”
याच मुलाखतीत भूमिकाने असाही खुलासा केला की ‘जब वी मेट’ या चित्रपटात तिची जागा करीनाने घेतली. यामुळे तिला खूप वाईट वाटलं होतं. इतकंच नव्हे तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेची ऑफरसुद्धा तिला मिळाली होती. मात्र नंतर तिची जागा अभिनेत्री ग्रेसी सिंहने घेतली.
‘तेरे नाम’ या चित्रपटानंतर सलमान खान आणि भूमिका चावलाने पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केला. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.