IND vs NZ : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव केला आहे. सध्या संपूर्ण भारतात भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचं कौतुक सुरु आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात यश मिळाल्यामुळे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचं स्थान पक्क झालं आहे. आता सर्व भारतीयांचं लक्ष फक्त आणि फक्त वर्ल्ड कप फायनलकडे आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने आपलं स्थान पक्क केलं आहे, पण बुधवारी झालेल्या सामन्याचा अभिनेता सलमान खान याला मोठा फटका बसला आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान खान याचा ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला. पण चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी ‘टागयर 3’ सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावल्याचं चित्र समोर आलं.
रिपोर्टनुसार, ‘टायगर 3’ सिनेमा चौथ्या दिवशी 20 कोटी रुपयांचा गल्ला देखील पार करु शकला नाही. सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाने बुधवारी फक्त 18.98 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. बुधवारी भाऊबीज होती म्हणून सिनेमा मोठी कमाई करु शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण भारत आणि न्यूझीलंड सामना असल्यामुळे प्रेक्षकांनी ‘टायगर 3’ सिनेमाकडे पाठ फिरवली असं देखील सांगण्यात येत आहे.
‘टायगर 3’ सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमामे प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 44.5 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 59 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 44 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आता शनिवारी – रविवारी सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सलमान खान याच्या ‘टायगर 3’ सिनेमाने आतापर्यंत 166.48 कोटी रुपयांचा गल्ला जमा केल आहे. सिनेमा लवकरच 150 कोटीचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सिनेमाने फक्त दोन दिवसांत 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं, आता ‘टायगर 3’ सिनेमा पाहाण्यासाठी देखील चाहते चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे ‘टायगर 3’ सिनेमा यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कोणत्या सिनेमाचा रेकॉर्ड मोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यंदाच्या वर्षी ‘पठाण’, ‘द केरळ स्टोरी’, ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.