Comedian Sunil Pal Kidnapped: प्रसिद्ध आणि लोकप्रिय विनोदवीर सुनील पाल बेपत्ता असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. कामासाठी गेलेला सुनील कुठे आहे, कसा आहे…याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. शिवाय अभिनेत्याचा फोन देखील बंद असल्याने कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. सुनील सोबत संपर्क होऊ शकत नसल्यामुळे अभिनेत्याची पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी सुनीलचा शोध लावला असून त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोचा विजेचा सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून कामासाठी मुंबईच्या बाहेर होता. 3 डिसेंबर रोजी घरी परतेल असं त्याने सांगितलं होतं. पण अभिनेता घरी परतला नाही. त्याचा फोन देखील बंद होता. अनेकदा फोन करुनही संपर्क होत नसल्यामुळे अभिनेत्याच्या पत्नीने पोलिसांची मदत घेतली. सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट देखील व्हायरल होत आहे. पोलिसांसोबत सुनीलचा संपर्क झाला आहे… असं समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू करण्यात आला. सांताक्रूझ पोलिसांनी सुनीलचे जवळचे मित्र आणि सहकारी यांची चौकशी केली. तपासादरम्यान, सुनीलचा फोन अचानक बिघडल्याचे समोर आले, त्यामुळे कुटुंबियांसोबत संपर्क होऊ शकला नाही.
अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलिसांचा सुनील याच्यासोबत संपर्क होऊ शकला. अभिनेता लवकरच मुंबईत परतेल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अभिनेत्याने मोठी माहिती दिली आहे. सुनील याने अपहरण झाल्याचं सांगितलं आहे. पण अभिनेत्याचं अपहरण कोणी केलं याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुनील पाल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. 2005 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोचा विजेता झाल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. शोमुळे अभिनेत्याच्या करियरला नवी दिशा मिळाली, ‘हम तुम’ आणि ‘फिर हेरा फेरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्याने भूमिका बजावली. सुनील पालच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.