मुंबई : 12 मार्च 2024 | ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. बिग बॉसच्या घरातही प्रियांकाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिझन संपल्यानंतर ती सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय झाली. प्रियांका ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. मात्र सध्या प्रियांकाला तिच्या लूकमुळेच जोरदार ट्रोल केलं जातंय. तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. याच फोटोंवरून नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. प्रियांकाने नाक आणि ओठांची सर्जरी केली का, असाही प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
प्रियांकाने गुलाबी रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र या सर्वांत तिचं नाक आणि ओठ नेहमीपेक्षा वेगळं दिसत असल्याचं अनेकांच्या निदर्शनास आलं. प्रियांकाने लिप फिलर केले असावेत असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. लिप फिलरमुळे ओठ हे नेहमीपेक्षा थोडे जाड दिसतात. या फोटोंमध्ये प्रियांकाचा असा बदललेला लूक पाहून चाहते नाराज झाले आहेत.
‘तू आधीच खूप सुंदर दिसत होती, आता चेहऱ्याची वाट लावून घेतलीस’, असं एकाने म्हटलं. तर ‘तुझा चेहरा फारच विचित्र दिसतोय’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘आणखी सुंदर दिसण्याच्या नादात काय काय करतात’, असंही युजर्सनी म्हटलं आहे. प्रियांका चहर लवकरच ‘नागिन 7’ या मालिकेत झळकणार असल्याचं कळतंय. एकता कपूरने तिच्या या लोकप्रिय मालिकेच्या नव्या सिझनसाठी प्रियांकाची निवड केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच प्रियांकाने नाक आणि ओठांची सर्जरी करून काहीतरी वेगळं दिसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत.
प्रियांकाने अभिनेता तुषार कपूरसोबतच्या एका प्रोजेक्टलाही होकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला होता. याआधी तिने रणदीप हुडासोबत एका म्युझिक अल्बममध्येही काम केलंय. ‘उडारिया’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. ‘बिग बॉस 16’ची फायनलिस्ट ठरलेली प्रियांका ही जरी ट्रॉफी आपल्या नावे करू शकली नसली तरी तिच्या खेळीने आणि दमदार व्यक्तीमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉसच्या घरात ती तगडी स्पर्धक ठरली होती. तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची अनेकदा सलमान खाननेही प्रशंसा केली होती.