मुंबई- बिग बॉसच्या घरात ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये जोरदार हंगामा होणार आहे. या शोचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्पर्धकांवर सलमान खान फार चिडलेला दिसतोय. शालीन आणि एमसी स्टॅन यांच्यात झालेल्या मारहाणीवरून सलमानने तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी सलमान दोघांची शाळा घेतो. मात्र शालीनने त्यावर दिलेलं उत्तर ऐकून सलमानच्या रागाचा पारा आणखी चढतो. रागाच्या भरात सलमान त्याचा कोट काढून जमिनीवर फेकून देतो.
बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जेव्हा मर्यादा ओलांडतात, तेव्हा अनेकदा सलमानचा राग अनावर झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी तर रागाच्या भरात सलमानने त्याचा कोट काढून जमिनीवर फेकला. सलमानचा हा राग शालीवर किती महागात पडेल हे प्रेक्षकांना आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.
शालीन आणि एमसी स्टॅन या दोघांना सलमान ओरडतो. मात्र त्यावर शालीनचं वक्तव्य ऐकून सलमानचा राग अनावर होतो. “बिग बॉसच्या घरात एक व्यक्ती स्वत:ला ब्रुस ली आणि दुसरा स्वत:ला दारा सिंग समजतोय. मजा तर तेव्हा आली असती जेव्हा तुम्ही एकमेकांना मारलं असतं”, असं सलमान म्हणतो. त्यानंतर तो एमसी स्टॅनची शाळा घेतो. “जेव्हा शिव्या देतोस तेव्हा स्वत:सुद्धा ऐकण्याची सवय करून घे. तुझ्या आईला हा व्हिडीओ क्लिप पाठवू का”, असा इशारा सलमान त्याला देतो.
सलमानचं ऐकल्यानंतर एमसी स्टॅन शालीनची माफी मागतो. मात्र त्यावर शालीन त्याला माफ करत नाही. उलट रागात म्हणतो, “या घरातून स्टॅन तरी जाईल किंवा मी तरी निघून जाईन. मला इथे राहायचं नाही.” यावर सलमान शालीनला म्हणतो, “काय परवानगी देऊ, याला मारून टाका. इथे कोणीच कोणाला थांबवत नाहीये.” हे ऐकून शालीन त्याच्या जागेवरून उठून निघून जातो.
शालीन रागाच्या भरात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार का, हे प्रेक्षकांना पुढील एपिसोडमध्ये पहायला मिळेल. बिग बॉसच्या घरात टीनाच्या पायाला दुखापत होते. त्यानंतर शालीन आणि एमसी स्टॅन तिची काळजी घेताना दिसतात. मात्र स्टॅन शालीनला एका गोष्टीवरून शिवी देतो. ते ऐकून शालीन त्याच्यावर भडकतो. त्यानंतर या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण होतो. या वादाचं रुपांतर मारहाणीत होतं.