मुंबई : रॅपर एमसी स्टॅनची खरी लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून अनेकांना आला असेल. बिग बॉसच्या घरात असताना सुरुवातीला त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. इतकंच नव्हे तर सतत घरी जाण्याचा हट्टही त्याने केला होता. मात्र ग्रँड फिनालेपर्यंत टिकून आणि विजेतेपद मिळवून स्टॅनने आपली लोकप्रियता सिद्ध केली. त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र अशा लोकांमुळे मला काही फरक पडत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया स्टॅनने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दिली. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने सोशल मीडियावर सर्वांत आधी विराट कोहलीचा आणि त्यानंतर शाहरुख खानचा विक्रम मोडला.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, एमसी स्टॅन एका ब्रँडच्या एक दिवसाच्या कमिटमेंटसाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपये मानधन घेतो. त्याचसोबत इन्स्टाग्रामवर एक रिल बनवण्यासाठी तो 18 ते 23 लाख रुपये मानधन घेतो. तर इन्स्टाग्राम स्टोरीसाठी तो पाच लाख रुपये फी घेतो. इन्स्टाग्रामची स्टोरी ही फक्त 24 तासांसाठी असते. बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनच्या मानधनात आणखी वाढ होणार असल्याचंही म्हटलं जातंय.
एमसी स्टॅनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या सहा महिन्यांत इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 400 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे फॉलोअर्स 1.8 दशलक्षांवरून 9.1 दशलक्षांवर गेले आहेत. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासांत जवळपास 20 ब्रँड्सनी करारासाठी एमसी स्टॅनशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर येत आहे.
बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅन पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. तो फक्त 10 मिनिटांसाठी लाइव्ह आला होता. यादरम्यान त्याने त्याच्या चाहत्यांसाठी लाइव्ह गाणीसुद्धा गायली. एमसी स्टॅनला लाइव्ह आल्याचं पाहताच त्याचे चाहते आणि बरेच सेलिब्रिटीसुद्धा या लाइव्हला जोडले गेले. पाहता पाहता स्टॅनने नवीन विक्रमसुद्धा रचला. स्टॅनच्या या लाइव्हमध्ये जितके चाहते जोडले गेले, तितके शाहरुख खान आणि विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींच्या लाइव्हलाही चाहते जोडले जात नाहीत. सोशल मीडियावर एमसी स्टॅनच्या या लाइव्हचे व्ह्यूज तब्बल 541k इतके झाले होते. अवघ्या काही मिनिटांत व्ह्यूजचा इतका मोठा आकडा गाठणारा स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे.
आतापर्यंत भारतातील कोणत्याच सेलिब्रिटीला इतके लाइव्ह व्ह्यूज मिळाले नव्हते. शाहरुख खानच्या इन्स्टाग्राम लाइव्हला जवळपास 255k इतके व्ह्यूज मिळायचे. तर बिग बॉसच्याही इतर स्पर्धकांच्या तुलनेत स्टॅन खूपच पुढे निघून गेला आहे.