मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून कलर्स टीव्हीवर सुरू असलेल्या लोकप्रिय ‘बिग बॉस 16’ या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. फिनालेच्या एक आठवड्या आधीपासूनच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विविध अंदाज वर्तवले जात होते. त्यातही शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी या दोन नावांची विजेतेपदासाठी खूप चर्चा होती. मात्र पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन याने अनपेक्षित विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. संपूण सिझनमध्य एमसी स्टॅन आणि शिव यांच्या मैत्रीची चर्चा होती. बिग बॉसच्या घरात या दोघांनी एकमेकांची खूप साथ दिली होती. आता मित्र शिवच्या पराजयावर एमसी स्टॅनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एसमी स्टॅन म्हणाला, “मला मनापासून वाईट वाटलं. पण कदाचित हा शो व्यक्तिमत्त्वावर आधारित होता. त्याने त्याची बाजू लोकांना दाखवली आणि मी बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. खूप कमी अंतराने तो हरला, आता त्यावर मी तरी काय करू शकतो.”
दुसरीकडे शिव ठाकरेनंही प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मते मी कुठेच कमी पडलो नाही. मला जितकी अपेक्षा होती, त्यापेक्षा जास्तच मला प्रेम मिळालं. मला शेवटपर्यंत टिकून राहायचं होतं. मला घरी बसून बिग बॉसचा फिनाले पहायचा नव्हता”, असं तो म्हणाला.
शिव ठाकरे हा रोडीज रायजिंग सिझन 2 च्या सेमी फिनालेपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला. शिवने बिग बॉस मराठीचं विजेतेपदही पटकावलं आहे. “बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर मला महाराष्ट्रात खरी ओळख मिळाली. बिग बॉस हिंदीच्या माध्यमातून मला राज्याबाहेरही पोहोचायचं होतं. जर मी इथपर्यंत टिकू शकलो, याचा अर्थ मी कुठेतरी नक्कीच पोहोचलो आहे. त्यामुळे मला शोचा फायदाच झाल आहे”, अशी प्रतिक्रिया शिवने दिली.
बिग बॉस 16 च्या घरात शिव ठाकरे हा ‘मंडली’चा मास्टरमाईंड म्हणून ओळखला जायचा. त्याच्या मंडलीमध्ये साजिद खान, अब्दु रोझिक, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर आहलुवालिया यांचा समावेश होता. शिव आणि त्याच्या मंडलीवर अनेकदा प्रेक्षकांकडून टीकाही झाली. मात्र बिग बॉसच्या घरात मी खरे मित्र कमावले, असं शिव म्हणाला.
प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच जणांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगली होती. त्यात रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारली. त्याला बिग बॉस 16 ची ट्रॉफी आणि 31 लाख 80 हजार रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली.