मुंबई : 24 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने पती नील भट्टसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली. पहिल्या दिवसापासून ही जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये ऐश्वर्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. नील भट्टशी लग्न करण्यापूर्वी ती राहुल पंड्याला डेट करत होती. ऐश्वर्याने उल्लेख केल्यापासून राहुलसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने ऐश्वर्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “तिने बिग बॉसच्या घरात माझ्याविषयी बरंच काही सांगितलंय, जे मला अजिबात आवडलं नाही. मला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली तर सर्वकाही स्पष्ट करू शकेन”, असं राहुल म्हणाला.
राहुल इतक्यावर थांबला नाही, तर तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे तिच्याविरोधात सर्व पुरावे आहेत आणि मी ते सर्व दाखवू शकतो. लोक मला येऊन बोलतायत की तुझी एक्स गर्लफ्रेंड बिग बॉसच्या घरात सतत तुझा उल्लेख करून अपमान करतेय. तू तिला पुढे जाण्यास नेहमीच मदत केली होतीस, तरी ती तुझ्याबद्दल हे सर्व बोलतेय.” बिग बॉसच्या घरात ऐश्वर्याने खुलासा केला होता की ब्रेकअपनंतर ती खचून गेली होती. तेव्हा नील भट्टने तिला धीर दिला होती.
ऐश्वर्या आणि नील हे दोघं ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत एकत्र काम करायचे. विशेष म्हणजे मालिकेत ऐश्वर्याने नीलच्या वहिनीची भूमिका साकारली होती. याच मालिकेत एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. एका मुलाखतीत आपली लव्ह स्टोरी सांगताना नील म्हणाला होता, “आम्हाला एकमेकांचा सहवास खूप आवडायचा. मैत्री कधी प्रेमात बदलली ते आम्हाला कळलंच नाही. पण पहिल्या दिवसापासून आम्ही एकमेकांबद्दल खूप गंभीर होतो. दोघांनाही शॉर्ट टर्म नातं नको होतं.” जवळपास वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर नील आणि ऐश्वर्याने 30 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न केलं.
मालिकेनंतर ऐश्वर्या आणि नीलने ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्येही भाग घेतला होता. या शोचे विजेते अंकिता लोखंडे आणि विकी जैन ठरले होते. त्यानंतर ऐश्वर्या ‘खतरों के खिलाडी 13’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या शोचं शूटिंग सुरू असतानाच तिला बिग बॉसची ऑफर मिळाली. मात्र ऐश्वर्यासोबत नीलसुद्धा शोमध्ये सहभागी होईल याची कल्पना प्रेक्षकांनीही केली नव्हती. सध्या ही जोडी बिग बॉसमध्ये चांगलीच चर्चेत आहे.