मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा सतरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रत्येक सिझनमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न या शोच्या निर्मात्यांचा असतो. त्यामुळे यंदाच्या सिझनचा थीमसुद्धा जरा हटके आहे. ‘दिल’, ‘दिमाग’ आणि ‘दम’ या तिन्ही गोष्टींचा वापर या खेळात होणार असल्याचं सूत्रसंचालक सलमान खानने प्रोमोमध्ये म्हटलं होतं. या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, त्याची यादी आतापर्यंत समोर आली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध स्पर्धकांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात यायचं असेल तर कॉन्ट्रोव्हर्सी ही हवीच. अशाच एका स्पर्धकाचं नाव सध्या समोर आलं आहे. या स्पर्धकाचं संपूर्ण आयुष्यच कॉन्ट्रोव्हर्सीने घेरलेलं आहे.
ही स्पर्धक आहे जिग्ना वोरा, जी मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डे यांसारख्या वृत्तपत्रांसाठी क्राइम रिपोर्टर म्हणून काम करत होती. बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये तिची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये तिचा चेहरा मात्र दिसत नाही. या प्रोमोमध्ये तिने तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोप आणि वादाविषयी वक्तव्य केलं आहे.
जिग्ना वोराचं नाव मोठ्या वादांमध्ये समोर आलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबतही तिचं कनेक्शन असल्याचा आरोप झाला होता. 11 जून 2011 रोजी झालेल्या पत्रकार ज्योतिर्मय यांच्या हत्येप्रकरणी काही लोकांची नावं समोर आली होती. यामध्ये जिग्नाचाही समावेश होता. या आरोपानंतर जिग्नाला सहा वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. ज्योतिर्मय यांच्या हत्येप्रकरणी ज्या आरोपींची नावं समोर आली होती, त्यामध्ये अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसुद्धा होता. छोटा राजन आणि जिग्ना यांच्यावर ज्योतिर्मय यांच्या हत्येचा आरोप होता.
2012 मध्ये लांबलचक चौकशी प्रक्रियेनंतर पोलिसांनी जिग्नाविरोधात अनेक कलमांअंतर्गत चार्जशीट दाखल केली होती. या आरोपाखाली तिला सहा वर्षांपर्यंत तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर तिची सुटका झाली. जिग्ना वोराच्या आयुष्यावर आधारित एक वेब सीरीजसुद्धा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं नाव ‘स्कूप’ असं होतं. ज्यामध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाने जिग्नाची भूमिका साकारली होती.