मुंबई : 28 जानेवारी 2024 | स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस 17’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. वाढदिवशी त्याला ही मोठी भेट मिळाली आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच जणांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. त्यापैकी सर्वांत आधी अरुण माशेट्टीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. त्याच्यापाठोपाठ अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा बाहेर पडले. अखेर मुनव्वर आणि अभिषेक यांच्यात कांटे की टक्कर पहायला मिळाली. त्यामध्ये मुनव्वरने बाजी मारली. त्याला बक्षीस म्हणून ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे.
मुनव्वर हा बिग बॉस या शोमध्ये सुरुवातीपासूनच लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. कॉमेडियन आणि गायक असलेल्या मुनव्वरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अनेक चढउतारांचा होता. बिग बॉसच्या घरातील मन्नारा आणि मुनव्वर यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली होती. या दोघांमध्ये बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झाली. मुनव्वरने अनेकदा टास्कदरम्यान मन्नाराची बाजू घेतली. त्यानंतर बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातच त्याची अंकिता लोखंडेसोबत चांगली मैत्री झाली होती. खेळात त्यांनी एकमेकांची साथ दिली होती. मात्र मुनव्वर आणि मन्नारा यांच्यातील जवळीक वाढल्याने अंकितासोबतच्या त्याच्या मैत्रीवर परिणाम होऊ लागला होता.
Congratulations @munawar0018 for this victory. Your journey truly inspired many. 🥳🏆#BB17 #BiggBoss17 #BiggBoss @BeingSalmanKhan #GrandFinale #BiggBoss17Finale pic.twitter.com/DjKBQCXvcv
— ColorsTV (@ColorsTV) January 28, 2024
बिग बॉसच्या घरात जेव्हा आयेशा खानने वाइल्ड कार्ड एण्ट्री केली, तेव्हा खेळाची सर्व समीकरणं बदलली. बिग बॉसच्या घरात येताच तिने मुनव्वरवर आरोप केले. एकाच वेळी दोघींना डेट केल्याचा आरोप तिने मुनव्वरवर केला होता. मुनव्वरने अनेक मुलींना फसवलंय, असाही गंभीर आरोप तिने केला होता. आयेशाकडून पोलखोल झाल्यानंतर मुनव्वरने सर्वांची माफीदेखील मागितली होती.
मुनव्वरचा जन्म 28 जानेवारी 1992 रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. तो स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपरसुद्धा आहे. गुजराती मुस्लीम कुटुंबातील मुनव्वरला लहानपणापासून अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला काम करावं लागलं होतं. मुनव्वरने कमी वयात अनेक छोटी-मोठी कामं करून कुटुंबीयांची आर्थिक मदत केली आहे. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. 2020 मध्य्ये मुनव्वरच्या वडिलांचंही निधन झालं. त्याचवर्षी त्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर स्टँडअप कॉमेडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘दाऊद, यमराज अँड औरत’ या व्हिडीओमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.