मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | टेलिव्हिजनवरील सर्वांत वादगस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीमध्ये सतत भांडणं पहायला मिळत आहेत. नुकताच या दोघांना बिग बॉसच्या घरात सरप्राइज मिळाला आहे. शोच्या पुढील एपिसोडमध्ये अंकिता आणि विकीची आई त्यांना भेटण्यासाठी येतात. सोशल मीडियावर या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आला आहे. आईला पाहून अंकिता आणि विकी दोघंही भावूक होतात. यावेळी अंकिताची सासू म्हणजेच विकीच्या आईने त्याला सल्ला दिला आहे. अंकिताशी भांडू नकोस, असं त्या म्हणाल्या.
अंकिता तिच्या आईला पाहून भावूक होते आणि तिला रडू कोसळलं. “आय लव्ह यू माँ, आय मिस यू माँ”, असं ती म्हणताना दिसतेय. त्यानंतर विकी त्याच्या आईला पाहून रडू लागतो. यावेळी विकीची आई दोघांना म्हणते, “घरी तुमच्यात कधी भांडणं झाली नव्हती आणि आता इथे तुम्ही एकमेकांशी किती वाईट पद्धतीने भांडत आहात. तुम्ही दोघं एकमेकांशी प्रेमाने वागा आणि प्रेमाने बोला.” शनिवारच्या एपिसोडमध्ये हे सर्व पहायला मिळणार आहे. अंकिता आणि विकीची आई त्यांना काय बोलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Tomorrow’s episode promo #WeekendKaVaar #BiggBoss17pic.twitter.com/nWXR7WcxJ2
— BiggBoss 24×7 (@BB24x7_) November 24, 2023
बिग बॉसच्या घरात दररोज अंकिता आणि विकीची भांडणं पहायला मिळत आहेत. या दोघांच्या भांडणांबद्दल अभिनेत्री काम्या पंजाबी, देवोलीना भट्टाचार्जी यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. काम्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘मला अंकिता खरंच आवडते पण असं वाटतंय की तिने या शोमध्ये यायला पाहिजे नव्हतं. पतीसोबत तर नक्कीच नाही. तिला आणि विकीला फार उशीर होण्याआधी हा खेळ समजू दे अशी आशा करते.’ ‘गोपी बहू’ ऊर्फ देवोलीना हिनेसुद्धा एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित विकीवर निशाणा साधला होता. ‘पती-पत्नीमध्ये मतभेद होतच असतात. परंतु दररोज पत्नीचा अपमान करणे, तिला वाईट वागणूक देणं हे अजिबात मनोरंजक नाही आणि हा खेळाचा भागसुद्धा होऊ शकत नाही’, असं तिने म्हटलं होतं.