मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस 17’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या लोकप्रिय शोला एक आठवडा पूर्ण होणार आहे. या पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूप ड्रामा पहायला मिळाला. त्यानंतर आता प्रेक्षकांना ‘वीकेंड का वार’ या एपिसोडची प्रचंड उत्सुकता आहे. या शोचा पहिला ‘वीकेंड का वार विथ सलमान खान’ फार धमाकेदार असणार आहे. सलमान कोणाची शाळा घेणार आणि कोणत्या स्पर्धकाचं कौतुक करणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.
‘बिग बॉस 17’च्या पहिल्या वीकेंडला प्रेक्षकांना बराच ड्रामा पहायला मिळणार आहे. घरातील बरेच स्पर्धक यावेळी सलमानच्या निशाण्यावर असतील. त्यापैकीच एक नाव आहे ईशा मालवीय. ‘भाईजान’ ईशावर जोरदार भडकताना दिसणार आहे. याची झलक शोच्या नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळाली. या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान ईशाच्या दुहेरी स्वभावाचा खुलासा करताना दिसत आहे. सलमान म्हणतो की, “तू आधी अभिषेकवर गंभीर आरोप केलेस. तू तुझ्या सोईनुसार वागतेस.” यावेळी तो मन्नारा चोप्राला पाठिंबा देतो.
‘वीकेंड का वार’चा एपिसोड आणखी खास करण्यासाठी ‘गणपत’ या चित्रपटातील कलाकार टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन हे पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. हे दोघं बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांसोबत मजेशीर टास्क करतानाही दिसणार आहेत. क्रिती आणि टायगरने दिलेल्या टास्कमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं भांडण पहायला मिळणार आहे. या टास्कनुसार, घरातील स्पर्धकांना एका अशा सदस्याचं नाव घ्यायचं असेल, ज्याला ते फ्लॉप मानतात. या टास्कमध्ये सर्वांत जास्त नाव ऐश्वर्या शर्माचं घेतलं गेलं.
यंदाच्या बिग बॉसच्या सिझनमध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यापैकी ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, अंकिता लोखंडे-विकी जैन, ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा हे स्पर्धक सर्वाधिक चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवशी नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. यातून पहिला स्पर्धक कोण घराबाहेर पडणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.