कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 18’ या शोमध्ये सध्या फिनाले वीक सुरू आहे. तीन दिवसांनंतर 19 जानेवारी 2025 रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. फिनाले वीकदरम्यान आधी श्रुतिका आणि त्यानंतर चाहत पांडे यांना बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर घरात सात स्पर्धक राहिले होते. यामध्ये विवियन डीसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर यांचा समावेश होता. मात्र फिनालेच्या तीन दिवस आधी आणखी एका स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागलं आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं कळतंय.
बिग बॉसच्या फिनाले वीकमध्ये ओमंग कुमार आले होते. ओमंग कुमार गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसचं घर वेगवेगळ्या थीमनुसार डिझाइन करतोय. या एपिसोडमध्ये ओमंग घरातील सदस्यांना पत्र आणून देतो. जवळच्या व्यक्तीने लिहिलेली ही पत्रे वाचून स्पर्धक भावूक होतात. त्यानंतर ओमंग शिल्पाला आणखी एक पत्र आणून देतात, ज्यामुळे ती स्पर्धेतून बाद झाल्याचं लिहिलेलं असतं. याविषयी अद्याप वाहिनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही. शिल्पा शिरोडकर ही नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. अभिनेत्री नम्रता शिरोडकर तिची बहीण असून महेश बाबू तिचे भावोजी आहेत. या सिझनच्या पहिल्या एपिसोडपासूनच शिल्पा सोशल मीडियावर चर्चेत होती.
शिल्पाच्या एलिमिनेशनंतर बिग बॉसच्या घरात फक्त सहा स्पर्धक राहिले आहेत. हा शो जिंकणाऱ्याला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार असल्याचं कळतंय. मात्र ऐनवेळी सुटकेसची ऑफर मिळाल्यास ही बक्षिसाची रक्कम कमी होऊ शकते. करणवीर मेहरा आणि विवियन डीसेना हे दोन तगडे स्पर्धक असल्याचं मानलं जात आहे. या दोघांना रजत दलाल आणि अविनाश मिश्रा यांच्याकडून चांगली टक्कर मिळतेय. त्यामुळे यंदाच्या सिझनची ट्रॉफी कोण पटकावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.