‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत असतो. या सिझनचा ग्रँड फिनाले जवळ आला असून शोमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट आणि ड्रामा पहायला मिळत आहेत. या शोमध्ये नुकताच ‘फॅमिली वीक’ पार पडला. यावेळी स्पर्धक चाहत पांडेच्या आईने दावा केला की त्यांच्या मुलीने कधीच कोणाला डेट केलं नाही आणि करणारही नाही. ती माझ्या इच्छेनुसारच लग्न करेल, असं त्यांनी म्हटलं होतं. याविरोधात ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानने थेट चाहतच्या सीक्रेट बॉयफ्रेंडचा खुलासा केला. सलमानचा हा खुलासा ऐकून भडकलेल्या चाहतच्या आईने थतेट बिग बॉसलाच खुलं आव्हान दिलं आहे. माझ्या मुलीच्या बॉयफ्रेंडला शोधून दाखवा, मी तुम्हाला 21 लाख रुपये भेट देईन, असं त्यांनी थेट जाहीर केलंय.
सलमानने ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये चाहतचा एक सेल्फी सर्वांना दाखवला होता. या सेल्फीमध्ये ती पाच वर्षांच्या एनिव्हर्सरीनिमित्त केक कापताना दिसली. यानंतर अविनाश म्हणाला, “याआधीच्या शोमध्ये प्रत्येकाला चाहतच्या रिलेशनशिपविषयी जाणून घ्यायचं होतं कारण रोज तिच्यासाठी भेटवस्तू यायचे.” चाहतने लगेच हे सर्व नाकारलं. त्यानंतर आता चाहतच्या आईने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “चाहतने तिच्या एका सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक ऑर्डर केला होता. त्याच केकसोबत तिने तो सेल्फी काढला होता”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“एका शोसाठी पडद्यामागे ऐशी-नव्वद लोकं काम करतात आणि अनेकदा त्यांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरे केले जातात. माझ्या मुलीने दुसऱ्यांसाठी तो केक ऑर्डर केला होता. जर रिलेशनशिपबद्दल काही असतं, तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. पण असं काहीच नाही. बिग बॉसच्या निर्मात्यांनी चाहतच्या या फोटोचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने वापरला आहे. मी बिग बॉसच्या निर्मात्यांना खुलं आव्हान देते की त्यांनी चाहतच्या बॉयफ्रेंडचं नाव किंवा फोटो शोधून दाखवावं. मी त्यांना 21 लाख रुपये बक्षीस देईन”, असं चाहतची आई म्हणाली.
चाहत पांडेची आई जेव्हा बिग बॉसच्या घरात पोहोचली होती तेव्हा त्यांनी अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांना बरंच काही ऐकवलं होतं. हे दोघं चाहतबद्दल सतत नकारात्मक बोलत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यांनी चाहतबद्दलच्या अपमानास्पद टिप्पणीनंतर अविनाशला ‘वुमनायजर’ म्हटलं होतं. “माझी मुलगी कोणालाच डेट करत नाही आणि करणारही नाही. मी जरी एखाद्या आंधळ्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं, तरी ती माझंच ऐकेल”, असं त्या म्हणाल्या होत्या.