‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ड्रग्स प्रकरणातील एजाज खान याच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर रोजी सीमाशुल्क विभागाने एजाज खानच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर आता याप्रकरणी अभिनेत्याच्या बायकोला अटक करण्यात आली आहे. एजाज खान याच्या पत्नीचं नाव फॉलन गुलीवाला असं आहे. फॉलन हिच्या जोगेश्वरी येथील घरावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्स प्रकरण एजाज खान याचा स्टाफ मेंबर सूरज गौड याच्याशी संबंधित आहे. ऑक्टोबरमध्ये सीमाशुल्क विभागाने वीरा देसाई रोडवर असलेल्या अभिनेत्याच्या कार्यालयावर छापा टाकला होता. रिपोर्टनुसार, तेव्हा पोलिसांनी 35 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम एमडीएमए जप्त केलं होतं.
नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळाली होती की फॉलोन गुलीवाला देखील ड्रग्ज प्रकरणात सामील आहे. अशा सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चौकशी केली आणि जोगेश्वरी येथे असलेल्या घराची झडती घेतली. तपासात पोलिसांनी 130 ग्रॅम गांजा आणि इतर नशेचे पदार्थ आढळले.
एजाज खान याची बायको फॉलन गुलीवाला हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. ड्रग्स प्रकरणी तपासणी करण्यासाठी फॉलन हिच्या घराची आणि ऑफिसची चौकशी केली. अभिनेत्याच्या पत्नीला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. एजाज खान याला अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलं नाही… असं माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात एजाज खान याला अटक करण्यात आली होती. अभिनेत्याजवळ अल्प्राझोलम नावाच्या औषधांच्या 31 गोळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्यावर कारवाई करण्यात आली होती. ड्रग्स प्रकरणात अभिनेता 2 वर्ष तुरुंगवास भोगल्या नंतर एजाज खान याची सुटका झाली. 19 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.40 वाजता एजाज खान याची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली.